‘प्‍यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्‍वीटी’ या चित्रपटांमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून नुसरत भरुचाला ओळखलं जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुसरत भरुचा सध्या तिच्या छोरी या भयपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने एका गरोदर महिलेची भूमिका साकारली आहे. यात नुसरतच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक केले जात आहे. सध्या नुसरत ही तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच नुसरतने दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यात घडलेल्या भूतांसंबंधित अनुभव शेअर केले आहेत. यावेळी तिने तिचा भूतांवर विश्वास असल्याचेही सांगितले.

नुसरत भरुचाने एका मुलाखतीत खासगी आयुष्यातील एक किस्सा शेअर केला आहे. “तुझा भूत, प्रेत आणि आत्मा यावर विश्वास आहे का?” असा प्रश्न तिला विचारला होता. त्यावर ती म्हणाली, “हो माझा या अशा गोष्टींवर विश्वास आहे. ज्या गोष्टी मी पाहू किंवा अनुभवू शकत नाही, अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. मला असे वाटते की या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आपण फक्त या गोष्टींचा विचार करतो की हे कसे होऊ शकते. विशेष म्हणजे माझा एलियन्सवरही विश्वास आहे. ते देखील या जगात कुठेतरी आहेत.”

हेही वाचा : “मला सोनिया गांधींना आठवण करुन द्यायची की तुमची सासू…”, जीवे मारण्याच्या धमकीनंतर कंगनाची पोस्ट चर्चेत

“मी लहानपणापासून भूतांवर विश्वास ठेवत असली तरी आतापर्यंत कधीच माझ्यासोबत असे काही घडले नव्हते. मात्र एकदा शूटिंगच्या संदर्भात मी दिल्लीला गेले होते. त्यावेळी मी ज्या हॉटेलमध्ये राहत होती तिथे मला अशाप्रकारे काहीतरी असल्याचे जाणवलं. त्या हॉटेलच्या खोलीत एक लहान कपाट होते. या कपाटात कपडे ठेवण्याइतकी जागा होती. त्याच्या शेजारी एक टेबल देखील होते, जिथे मी माझी सुटकेस बॅग ठेवली होती. रात्रभर ती बॅग उघडी होती.” असे तिने म्हटले.

“पण जेव्हा मला सकाळी जाग आली तेव्हा मी समोरचे दृश्य पाहून थक्क झाली. मी सकाळी उठून पाहिले की माझी सुटकेस खाली पडली होती. माझे सर्व कपडे विखुरलेल्या अवस्थेत होते. हे सर्व दृश्य पाहिल्यावर मला फार भीती वाटली. मी रात्री झोपताना माझी बॅग टेबलावर ठेवली होती हे मला चांगले आठवते. पण मग सकाळी ती अशाप्रकारे खाली पडलेली आढळल्यामुळे मला फार विचित्र वाटले. यानंतर मी अवघ्या ३० सेकंदात हॉटेलच्या बाहेर आली. त्या हॉटेलच्या रुममध्ये सर्व काही विचित्र होते. ते फार भीतीदायक होते. यानंतर मी सर्वांना सांगितले की आपल्याला हॉटेलचा रुम लगेचच सोडायला हवा. त्यानंतर आम्ही ते हॉटेल मधून चेकआऊट केले,” असे नुसरत म्हणाली.