खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. निखिल जैन आणि नुसरत जहाँ यांच्या लग्नाला कोर्टाने बेकायदेशीर करार दिला आहे. कोलकाता कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, “नुसरत जहाँ या मुस्लिम धर्मीय आहेत. तर निखिल जैन हे हिंदू आहेत. भारतीय विशेष विवाह कायद्यांतर्गत या दोघांचेही लग्न झालेले नाही,” असे कोर्टाने आदेशात म्हटलं आहे.

कोलकाताच्या एका कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, “नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह १९ जून २०१९ रोजी तुर्की कायद्यानुसार करण्यात आला होता. मात्र तो भारतीय कायद्यानुसार अवैध आहे. नुसरत जहाँ या मुस्लिम धर्मीय आहेत. तर निखिल जैन हे हिंदू आहेत. या दोघांचा विवाह हा भारतीय विशेष विवाह कायद्यांतर्गत होणे गरजेचे होते. मात्र तो तुर्की कायद्यानुसार करण्यात आला आहे. त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध आहे,” असे कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टाच्या या आदेशापूर्वीच नुसरत जहाँ यांनी “निखिल जैनसोबत झालेला विवाह हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने अवैध होता”, असे स्पष्टीकरण दिले होते. याबाबत काही महिन्यांपूर्वी दिलेल्या निवेदनात नुसरत जहाँ म्हणाल्या, “आमचं लग्न तुर्की कायद्यानुसार झालं होतं. ते भारतीय विशेष विवाह कायद्यानुसार वैध होणं आवश्यक होतं. पण ते झालं नाही. इथल्या कायद्यानुसार ते लग्न नव्हतं, तर फक्त एक नातं किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप होतं. त्यामुळे औपचारिक घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही. आम्ही फार पूर्वीच वेगळे झालो आहोत. फक्त मी त्यावर भाष्य टाळलं होतं. त्यामुळे माझ्या कृतीवर कुणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही”, असं नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केलं आहे.

२०१९ मध्ये निखिल जैनसोबत लग्नगाठ बांधली

अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केले होते. त्यांनी केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे देखील त्यावेळी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. पण लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि अखेर त्यांनी हे लग्नच अमान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे याची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली होती.

नुसरत जहाँ नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी नकार देत होत्या, असे निखिल जैन याने सांगितले होते. ऑगस्ट २०२० पासून त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि नोव्हेंबरमध्ये त्या घर सोडून गेल्या असल्याचे देखील निखिल जैनने सांगितले होते. त्यानंतर त्या अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नुसरत जहाँ यांनी २६ ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी मुलाचे नाव इशान जे दासगुप्ता ठेवल्याचे म्हटले जाते. इशानच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव देबाशिस दासगुप्ता असे लिहिण्यात आले होते. देबाशिस हे यश दासगुप्ताचे खरे नाव आहे.