खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी निखिल जैन आणि नुसरत जहाँ यांच्या लग्नाला कोर्टाने बेकायदेशीर करार दिला आहे. “नुसरत जहाँ या मुस्लिम धर्मीय आहेत. तर निखिल जैन हे हिंदू आहेत. भारतीय विशेष विवाह कायद्यांतर्गत या दोघांचेही लग्न झालेले नाही,” असे कोर्टाने आदेशात म्हटले होते. त्यानंतर आता नुसरत जहाँ यांनी बॉयफ्रेंड, अभिनेता यश दासगुप्ताशी लग्न केले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा नुसरत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाल्या आहे.

नुसरत जहाँ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यश दासगुप्तासोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी छान असा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये त्या सुंदर दिसत आहेत. यश दासगुप्ताने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत नुसरत यांनी दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी ‘आम्हाला आशिर्वाद द्या’ असे म्हटले आहे.
Video : बापरे! गायिकेवर चक्क नोटांचा पाऊस, व्हिडीओ एकदा नक्की पाहाच

नुसरत जहाँ यांनी शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी त्यांचे लग्न झाले असून ते आशिर्वाद मागत आहेत असे म्हटले आहे. पण हा फोटो त्यांच्या आगामी चित्रपटातील आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केल्याचे हॅशटॅग वापरत म्हटले आहे.

२०१९ मध्ये निखिल जैनसोबत लग्नगाठ बांधली

अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केले होते. त्यांनी केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे देखील त्यावेळी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. पण लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि अखेर त्यांनी हे लग्नच अमान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे याची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली होती.

नुसरत जहाँ नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी नकार देत होत्या, असे निखिल जैन याने सांगितले होते. ऑगस्ट २०२० पासून त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि नोव्हेंबरमध्ये त्या घर सोडून गेल्या असल्याचे देखील निखिल जैनने सांगितले होते. त्यानंतर त्या अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नुसरत जहाँ यांनी २६ ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी मुलाचे नाव इशान जे दासगुप्ता ठेवल्याचे म्हटले जाते. इशानच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव देबाशिस दासगुप्ता असे लिहिण्यात आले होते. देबाशिस हे यश दासगुप्ताचे खरे नाव आहे.