खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. त्यानतंर अवघ्या काही दिवसांपूर्वी निखिल जैन आणि नुसरत जहाँ यांच्या लग्नाला कोर्टाने बेकायदेशीर करार दिला. त्यानंतर आता नुसरत जहाँ यांनी बॉयफ्रेंड, अभिनेता यश दासगुप्ताशी लग्न केले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच नुसरत जहाँ यांनी पहिल्यांदा मुलगा इशानचा चेहरा दाखवणारा फोटो शेअर केला आहे.

नुसरत जहाँ यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता या दोघांचा मुलगा इशानचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. नुसरत जहाँ यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ त्यांच्या एका फॅनपेजने तयार केला आहे. त्यांनी तो स्वत: इनस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे.या व्हिडीओच्या सुरुवातीला यश दासगुप्ता यांचा एक फोटो समोर येतो. त्यावर पापा असे लिहिलेले असते. त्यानंतर नुसरत जहाँ यांचा फोटो समोर येतो आणि त्यावर आई असे लिहिलेले असते. यानंतर पुढे त्यांच्या बाळाचा इशानचा एक फोटो समोर येतो त्यावर मी असे लिहिलेले आहे.

हा संपूर्ण व्हिडीओ मिमि नुसरत लव्हर या नावाच्या एका फॅनपेजने तयार केला आहे. यात इशानचा चेहरा पहिल्यांदा दिसत आहे. त्याने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, असेही यात दिसत आहे. दरम्यान हा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : नुसरत जहाँ यांनी केले यश दासगुप्ताशी लग्न? फोटो शेअर करत म्हणाल्या, ‘आम्हाला आशिर्वाद द्या’

(फोटो – नुसरत जहाँ इन्स्टाग्राम)

२०१९ मध्ये निखिल जैनसोबत लग्नगाठ बांधली

अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केले होते. त्यांनी केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे देखील त्यावेळी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. पण लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि अखेर त्यांनी हे लग्नच अमान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे याची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली होती.

नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह बेकायदेशीर, न्यायालयाचा निर्णय

नुसरत जहाँ नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी नकार देत होत्या, असे निखिल जैन याने सांगितले होते. ऑगस्ट २०२० पासून त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि नोव्हेंबरमध्ये त्या घर सोडून गेल्या असल्याचे देखील निखिल जैनने सांगितले होते. त्यानंतर त्या अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नुसरत जहाँ यांनी २६ ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी मुलाचे नाव इशान जे दासगुप्ता ठेवल्याचे म्हटले जाते. इशानच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव देबाशिस दासगुप्ता असे लिहिण्यात आले होते. देबाशिस हे यश दासगुप्ताचे खरे नाव आहे.