पाकिस्तानातील अनेक प्रदेशांमध्ये तालिबान्यांची दहशत असून अनेक प्रकारचे अत्याचार त्यांच्याकडून केले जातात. पाकिस्तानातील खैबर पख्तुनवाला या वायव्य प्रांतातील ठिकाणी शिक्षणविषयक काम करणारी कार्यकर्ती मलाला युसूफजाई यांच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला होता. याच विषयावर आधारित चित्रपट ‘गुल मकाई’ दिग्दर्शक अमजद खान तयार करणार आहेत. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी जनरल कयानी ही भूमिका साकारणार आहेत. आपल्या या नव्या चित्रपटात तालिबानकडून निर्माण केली जाणारी दहशत दाखविण्यात येणार असून तालिबानी अधिकाऱ्यांची खरी नावे वापरली आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतील अधिकारी, सरकारी अधिकारी यांचीही खरी नावे वापरली आहेत, असे अमजद खान यांनी म्हटले आहे.
गुजरातमधील भुज येथे या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरमध्येच केले जाणार आहे. ‘गुल मकाई’ हे टोपणनाव वापरून मलाला युसूफजाई यांनी ब्लॉग लिहिला होता. हेच नाव चित्रपटाला देण्यात आले आहे. यापूर्वी अमजद खान यांनी हाच ब्लॉग वाचून ‘ले गया सद्दाम’ हा चित्रपट केला होता. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ओम पुरी यांच्या व्यतिरिक्त कबीर बेदी, के के मेनन, मुकेश ऋषी, व्हिक्टर बॅनर्जी, अभिमन्यू सिंग, आरिफ झकेरिया, गुलशन ग्रोव्हर यांसारख्या बॉलीवूडपटांमध्ये खलनायकी, चरित्र व्यक्तिरेखा साकारणारे कलावंतही वास्तव आयुष्यातील खऱ्या व्यक्तींवर आधारित व्यक्तिरेखा चित्रपटात साकारणार आहेत. तालिबान्यांचा प्रवक्ता मुस्लिम खान ही व्यक्तिरेखा कबीर बेदी साकारणार आहे. तालिबान अधिकारी फझिउल्लाह ही व्यक्तिरेखा मुकेश ऋषी साकारतोय. मलाला यांच्यावरील हल्ला फझिउल्लाह यानेच घडवून आणला होता. मलाला ही व्यक्तिरेखा बांग्लादेशी अभिनेत्री फातिमा शेख करणार आहे.  असिफ अली झरदारी ही व्यक्तिरेखा व्हिक्टर बॅनर्जी करणार असून पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस दिग्दर्शक अमजद खान यांनी व्यक्त केला आहे.