रेश्मा राईकवार
‘कंठात आर्त ओळी, डोळय़ात प्राण आले.. आता समेवरी हे कैवल्यगान आले..’ या ओळी ऐकताना पडद्यावर दिसणाऱ्या वसंतरावांच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्यात प्रेक्षक अक्षरश: दंग होऊन जातात. ‘मी वसंतराव’ चित्रपटातील एका प्रसंगात पंडित दीनानाथ मंगेशकरांच्या तोंडी एक संवाद आहे. गायकाचे गाणे सादर झाल्यानंतर प्रेक्षागारात पसरणारी नि:शब्द शांतता.. ही खरी त्या कलाकाराची पावती असते. तशी दाद आयुष्यात मिळायला हवी. तीच शांतता, तोच नि:शब्द अनुभव चित्रपट पाहताना आपल्या मनाशी जमा होतो. तो नितळ भावानुभव संपत नाही, तो पार आत कुठेतरी पोहोचतो. एखादी व्यक्ती अंतर्बाह्य वाचता यावी, अनुभवता यावी, ती समजून घेण्यासाठी मनाची तगमग व्हावी.. तो जणू त्याचा जीवनपट नव्हे आपलाच होऊन जावा. समोरची कलाकृती आणि तो पाहणारा प्रेक्षक या मी तूपणाच्या संकल्पनाच मिटवून टाकणारा काहीसा एकात्म भावानुभव म्हणजे ‘मी वसंतराव’.
चरित्रपटांची एक लाटच्या लाट प्रेक्षकांनी आपल्या अंगावर घेतली आहे. त्यातले हुबेहूब त्या व्यक्तीसम दिसणारे किमान भासणारे कलाकार, ज्याची कथा आपण पाहात आहोत तो खचितच दैवी देणगी घेऊन भूतलावर आला आहे. किमान तो आपल्यापेक्षा वेगळा नक्कीच आहे, ही जाणीव करून देत रंगणारे संघर्षपट आपण कित्येकदा अनुभवले आहेत. प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट हा भाव कायमच आपल्या ठायी असतो, चरित्रपट पाहताना तो अधिकच ठळकपणे मनात दाटून येतो. हे असं कुठलंच ठरीव काहीही ‘मी वसंतराव’ पाहताना जाणवत नाही. हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक म्हणून लौकिक मिळवलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहतो आहोत, असा भाव तुमच्या मनाला शिवणारच नाही. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीचा आयुष्य समजून घेण्याचा, आतून येणारं गाणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा ध्यास आपल्यासमोर उलगडत जातो. या चरित्रपटाकडे पाहण्याचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांचा दृष्टिकोनच वेगळा आहे. एखाद्याला देवत्व बहाल करणं किंवा त्याचं देवत्व सिध्द करणं अशी कुठलीच चौकट वा बंधन लेखक-दिग्दर्शकाने घालून घेतलेलं नाही. त्यामुळे अत्यंत साधी-सरळ आणि तरीही अर्थपूर्ण अशी या चित्रपटाची मांडणी आहे.
नागपुरातील एका रात्रीत घराबाहेर पडलेल्या आईच्या काखोटीला बांधून सुरू झालेला तान्हया वसंताचा प्रवास हा मुळातच नकारातून आणि रूढ चौकटी मोडून झालेला आहे. गाणं मानणारा, शेवटपर्यंत गाणं जगणाऱ्या वसंताची कथा लेखक म्हणून उपेंद्र शिधये आणि निपुण धर्माधिकारी यांनी खूप सुंदर पध्दतीने लिहिली आहे. साध्या-सोप्या संवादातून हा प्रवास उलगडत जातो. वसंताच्या जगण्याचं मर्म आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चरित्रपटात त्या त्या व्यक्तिरेखेशी हुबेहूब दिसणारे कलाकार उभे करण्याचा आटापिटाही या चित्रपटात नाही. त्यामुळे अभिनेता अमेय वाघने साकारलेले पंडित दीनानाथ मंगेशकरही आपण त्याच सहजतेने कथेच्या ओघात स्वीकारत जातो. तोच सहजपणा पुलंची भूमिका साकारणाऱ्या पुष्कराज चिरपुटकर या तरुण अभिनेत्याच्या बाबतीत म्हणता येईल, सप्रे गुरुजी, बेगम अख्तर असोत वा वसंतरावांची आई, पत्नी अगदी खुद्द वसंतरावांच्या भूमिकेबाबतीतही कुठल्याही पध्दतीने त्यांच्याशी साधम्र्य साधण्याचा वा त्यांची नक्कल उतरवण्याचा प्रयत्न केलेला नाही. मुळात या चित्रपटातील कुठलीच व्यक्तिरेखा त्यांच्या त्यांच्या उत्कट प्रतिमेत कैद अशा पध्दतीने सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या व्यक्तिरेखा आपल्याशा वाटत राहतात. वसंतरावांवर त्यांच्या आयुष्यात वेगवेगळय़ा टप्प्यावर आलेल्या व्यक्तींचे आपले म्हणून काही संस्कार झाले आहेत. यातला प्रत्येकजण त्यांचा संगीतातील गुरू नाही, तरीही त्या त्या व्यक्तीचं म्हणून काही एक वसंतरावांच्या मनावर उमटत गेलं आहे. या संस्कारांतून, या विचारांतून, परिस्थितीतून घडत गेलेले वसंतराव आपल्याला हळूहळू आकळत जातात. जगण्याचा रसरशीत अनुभव घेण्यासाठी आसुसलेली ही कलावंत मंडळी. त्यांचे आपापसातील संवाद अगदी पुलं आणि वसंतराव यांच्यातील निखळ घट्ट मैत्री, बेगम अख्तर यांच्याबरोबरचा काहीसा अबोल संवाद हे सगळं एक वेगळंच रसायन होतं. इथे त्या व्यक्तीप्रति असणारा स्नेहभाव आहेच, त्याच्या कलेप्रतिचा आदर आहे, समोरच्या व्यक्तीची कला ही इतरांपेक्षा वेगळी आहे, त्याची अनुभूती आपल्याबरोबरच इतरांनाही मिळायला हवी, ही आस इथे पाहायला मिळते. त्यासाठी जिवाभावाचे प्रयत्न केले जातात. वसंतरावांनी केलेले गुरू, त्यांचं गायकीच्या कुठल्याही रूढ चौकटी न मानणारं गाणं, माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं हा ठाम आत्मविश्वास.. या सगळय़ा गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, मात्र त्या त्या प्रसंगात वसंतराव कशा पध्दतीने घडत गेले, बदलत गेले, हा भाव चित्रकृतीतून थेट पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. वसंतरावांबरोबरच बदलत्या काळाचे आणि त्या त्या काळानुसार बदलत गेलेल्या व्यक्तींच्या धारणा, शास्त्रीय गायन- नाटय़संगीताबद्दलच्या रूढ कल्पना, या घुसळणीतून काही कलाकारांच्या पदरी पडलेले यश आणि अपयश हे संदर्भही कथेच्या ओघात उलगडत जातात. ही मांडणीच अत्यंत वेगळी आणि धाडसी आहे. त्यासाठी दिग्दर्शक म्हणून निपुणचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या चित्रपटातील गाणी हाही संपूर्णपणे एक वेगळा अनुभव आहे. एकेक गाणे त्याची सुरावट, त्याचे शब्द, भावार्थासह मनात कोरले जाते. चित्रपटाची लांबी मोठी असली तरी तो कुठेही कंटाळवाणा होत नाही.
सशक्त लेखन, तितकीच सार्थ, प्रभावी दिग्दर्शकीय मांडणी आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय अशी उत्तम मैफल ‘मी वसंतराव’च्या निमित्ताने अनुभवायला मिळते. राहुल देशपांडे आणि वसंतराव हे वेगळे काढताच येऊ शकत नाहीत इतके तादात्म्य राहुल यांच्या अभिनयात पाहायला मिळते. अनिता दाते यांनी साकारलेली वसंतरावाची आई, मामा झालेला आलोक राजवाडे, कुमुद मिश्रा, दुर्गा जसराज, यतीन कार्येकर, पुष्कराज चिरपुटकर, सारंग साठय़े, अमेय वाघ ही सगळीच कलाकार मंडळी त्यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळय़ाच व्यक्तिरेखांमध्ये पाहायला मिळतात. या कलाकारांच्या निवडीमुळे एक ताजेपणा चित्रपटात अनुभवाला येतो. एकेक सूर एकमेकांत सहज मिसळून जावा आणि गाणं रंगत जावं तसा हा चित्रपट आपल्या मनात खोल खोल उतरत जातो. कैवल्याचं चांदणं अनुभवावं जणू असा निर्भेळ आनंददायी उत्कट भावानुभव देणारा असा चित्रपट आजच्या काळात विरळा.
मी वसंतराव
दिग्दर्शक – निपुण धर्माधिकारी
कलाकार – राहुल देशपांडे, अनिता दाते, आलोक राजवाडे, कुमुद मिश्रा, सारंग साठय़े, पुष्कराज चिरपुटकर, अमेय वाघ, यतीन कार्येकर, कौमुदी वालावलकर.