मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी अँटोनी पेरुंबावूर यांच्या ‘आशीर्वाद सिनेमाज’बरोबर मिळून अनेक सुपरहिट कमर्शिअल चित्रपट दिले. पण त्यापूर्वी मल्याळम सुपरस्टार मोहनलाल सुरुवातीच्या काळात स्वतः चित्रपट निर्मिती करत असत. यापैकी बहुतांश चित्रपटांचे खूप कौतुक झाले होते आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तर काही चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या फ्लॉप ठरले होते. त्यामुळे मोहनलाल यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
दिग्दर्शक आय.व्ही. शशी यांचा ‘अदियोझुक्कुकल’ (१९८४) आणि ‘करिंपिनपूबिनक्कारे’ (१९८५), सत्यन अंथिकाड यांचा ‘गांधीनगर सेकंड स्ट्रीट’ (१९८६) आणि ‘नादोदिक्काट्टू’ (१९८७), कमल यांचा ‘उन्नीकाले ओरू कथा परायम’ (१९८७) आणि ‘ओरक्काप्पुराथू’ (१९८८), तसेच प्रियदर्शन यांचा ‘आर्यन’ (१९८८) यांसारख्या चित्रपटांची सह-निर्मिती मोहनलाल यांनी केली. त्यानंतर त्यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी ‘प्रणवम आर्ट्स इंटरनॅशनल’ सुरू केली.
स्वतः निर्मिती केलेल्या चित्रपटांसाठी मोहनलाल यांना मिळाले राष्ट्रीय पुरस्कार
नऊ वर्षांत मोहनलाल यांनी १० चित्रपटांची निर्मिती केली. यातील बहुतेक चित्रपट अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे होते. यातून मोहनलाल यांच्या अभिनयाचे खास पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, ‘प्रणवम आर्ट्स’ने निर्मिती केलेल्या चित्रपटांमुळेच मोहनलाल यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चे दोन्ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. त्यांना पहिला पुरस्कार सिबी मलायिल यांच्या ‘भरथम’साठी (१९९१) तर दुसरा पुरस्कार शाजी एन. करुण यांच्या ‘वनप्रस्थम’ (१९९९) मधील कथकली कलाकाराच्या भूमिकेसाठी मिळाला होता.
‘हिज हायनेस अब्दुल्ला’ (१९९०), ‘कमलादलम’ (१९९२), ‘मिथुनम’ (१९९३), ‘कालपानी’ (१९९६) आणि ‘कनमादम’ (१९९८), ‘पिंगामी’ (१९९४), ‘हरिकृष्णन्स’ (१९९८) आणि ‘ऑलिम्पियन अँथनी ॲडम’ (१९९९) यांसारख्या मनोरंजक चित्रपटांची मोहनलाल यांनी निर्मिती केली. ‘वनप्रस्थम’नंतर त्यांनी अँटोनी पेरुंबावूर यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दशकाहून अधिक काळ त्यांनी स्वतंत्रपणे कोणत्याही चित्रपटाची निर्मिती केली नाही, थेट मेजर रवी यांच्या ‘कंधार’ (२०१०) या चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले.
निर्माता म्हणून फ्लॉप चित्रपट
‘प्रणवम आर्ट्स’च्या बहुतांशी चित्रपटांना कालांतराने ‘कल्ट क्लासिक’ दर्जा मिळाला असला, तरी त्यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. यामध्ये ‘कालपानी’ आणि ‘पिंगामी’चा समावेश आहे. ‘ऑलिंपियन अँथनी ॲडम’ हा चित्रपटही फारसा चालला नाही. भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त सहकार्यातून बनलेल्या ‘वनप्रस्थम’ला अनेक पुरस्कार मिळाले असले, तरी तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. १९९८ च्या ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, ३.८ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटामुळे मोहनलाल यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.
मोहनलाल यांचे लाखो रुपये बुडाले
याबद्दल प्रसिद्ध पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते श्रीनिवासन यांनी एकदा खुलासा केला होता. त्यांच्यामते, या काळात मोहनलाल इतके निराश झाले होते की त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं होतं. त्यांनी मोक्ष शोध हिमालयात निघून जाण्याचा विचारही केला होता. कैराली टीव्हीवरील एका टॉक शोमध्ये बोलताना श्रीनिवासन म्हणालेले, “मोहनलाल पैशांसाठी निर्माते बनले होते की नाही मला माहीत नाही. पण मला खात्री आहे की त्यांना चांगले चित्रपट बनवायचे होते. ‘वनप्रस्थम’ला अनेक पुरस्कार मिळाले, पण चित्रपट निर्मितीत त्यांचे लाखो रुपये बुडाले.”
मोहनलाल यांनी एका स्टुडीओमध्ये संन्यासी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. “सिनेमा काय आहे? दिवसेंदिवस, फक्त सिनेमा, सिनेमा आणि सिनेमाच आहे. हे सगळं व्यर्थ आहे. मी आता दुसऱ्या गोष्टीचा विचार करत आहे. तुम्ही माझ्याबरोबर आलात तर मला आनंद होईल. मी केरळमधून हिमालयात जाण्याचा विचार करतोय,” असं मोहनलाल श्रीनिवासन यांना म्हणाले होते.
काय म्हणाले होते मोहनलाल?
श्रीनिवासन यांनी मोहनलाल यांना विचारलं की ते संन्यास घ्यायचं म्हणतायत का? त्यावर मोहनलाल म्हणाले, “लेबल्स लावायची गरज नाही. मला फक्त सर्व विसरायचं आहे. आपण पैसे घेऊन जायचं नाही, रोज सुमारे ५० किमी चालत जाऊ, नंतर कुठेतरी विश्रांती घेऊ. अन्नासाठी, आपण तिथे कोणासाठी तरी काम करू. अशा प्रकारे जगू. चला पैशांशिवाय हिमालयापर्यंत चालत जाऊ.”
श्रीनिवासन यांनी केला विनोद
आर्थिक नुकसानीमुळे झालेल्या मानसिक ताणामुळे मोहनलाल असं बोलत आहेत हे लक्षात आल्यावर श्रीनिवासन यांनी त्यांचा मूड हलका करण्याचा प्रयत्न केला, “हिमालय किंवा काश्मीरला जायला सर्वात जवळचं विमानतळ कुठे आहे?” हे ऐकून मोहनलाल यांनी विचारलं, “विमानतळ कशाला हवंय?” त्यावर श्रीनिवासन म्हणाले, “मला इतकं दूर चालणं जमणार नाही. मी विमानाने येईन आणि तिथे तुमची वाट पाहीन!”
श्रीनिवासन व मोहनलाल दोघे खूप जवळचे मित्र होते. त्यांनी बरीच वर्षे अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. श्रीनिवासन यांचं २ डिसेंबर २०२५ रोजी निधन झालं.
