Sonu Nigam On Asha Bhosle: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज, रविवारी (१२ एप्रिल २०२६) निधन झाले. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

“हा संपूर्ण प्रवास मी आनंदाने आणि अभिमानाने लक्षात ठेवेन”

आता सोनू निगमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिले, “आज एका महान गायिकेचे निधन झाले. भारतीय चित्रपटसंगीतातील त्या शेवटच्या योद्धा होत्या. त्यांनी आज आपल्याला कायमचा निरोप दिला. त्या एक परिपूर्ण आयुष्य जगल्या. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अनेक आव्हाने आली, पण त्या काम करत राहिल्या. त्यातून त्यांना महानता मिळाली. गेल्या अनेक दशकांमध्ये त्यांनी त्यांच्या गाण्यातून अब्जावधी लोकांच्या आयुष्यात स्थान मिळवले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत त्या रियाज करत होत्या. त्या आमच्यासारख्या कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहेत.”

पुढे सोनू निगमने लिहिले, “आशाजी, १९९४ मध्ये तुम्हाला भेटल्यापासूनचा प्रवास मी कायम लक्षात ठेवीन. २०२४ मध्ये आपला शेवटचा कॉन्सर्ट होता. गेल्या वर्षी दोन गाणी आपण एकत्र गायली. हा संपूर्ण प्रवास मी आनंदाने आणि अभिमानाने लक्षात ठेवेन. मी एवढंच म्हणू शकतो, “चले तो गये हो पर, दिल अभी भरा नहीं. पुन्हा भेटू, ॐ शांती.”

सोनू निगमने एका कार्यक्रमात आशा भोसले यांचे पाय धुतले होते. २०२४ मध्ये दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आशा भोसले यांच्या जीवनावरील ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, सरसंघचालक मोहन भागवत, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. लोकप्रिय गायक सोनू निगमदेखील तिथे उपस्थित होता.

या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले होते की, तो जमिनीवर बसतो, आशाताईंचे पाय स्वच्छ कपड्यावर ठेवतो आणि त्यांचे पाय धुण्याआधी कपाळाला हात लावतो. गुलाबाच्या पाकळ्या असलेल्या पाण्याने आशाताईंचे पाय धुतल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले होते. त्यानंतर आशाताई सोनू निगमला आशीर्वाद देत असल्याचेदेखील पाहायला मिळाले. त्याच्या या कृतीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तक प्रकाशनावेळी सोनू निगमने आशा भोसले यांच्याविषयी बोलताना म्हटले होते की, ‘देवी मातेला अभिवादन, मला अजिबात काही बोलायचे नव्हते; पण मला बोलण्यासाठी सांगण्यात आले आहे. मी एवढेच म्हणू इच्छितो की, आज शिकण्याची अनेक माध्यमे आहेत, पण ज्याकाळी शिकण्यासाठी कोणतीच साधने उपलब्ध नव्हती, तेव्हा लताजी आणि आशाजी तिथे होत्या. त्यांनी संपूर्ण जगाला गाणं शिकवलं आहे”, असे म्हणत सोनू निगमने कृतज्ञता व्यक्त केली होती.

दरम्यान, पुस्तक प्रकाशनावेळी आशा भोसले भावूक झाल्या होत्या. त्या म्हणालेल्या, “माझ्या आयुष्यात कधी असं पुस्तक प्रकाशित होईल याची कल्पना नव्हती, माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत राहा. दीदीच्या नावाशिवाय हा कार्यक्रम संपता कामा नये. मी घरातली तिसरी बहीण. आमचा एक पांडव गेला तरीही मी अजून आहे”, असं म्हणताना त्या भावूक झाल्या होत्या.