१९९९ साली प्रदर्शित झालेला ‘द अमेरिकन पाय’ हा इतिहासातील सर्वोत्तम अ‍ॅडल्ट कॉमेडी चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. किशोरवयीन मुलांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेत होणाऱ्या बदलांवर आधारित हा चित्रपट आहे. या विषयावर आजवर ‘द ४० इयर्स ओल्ड व्हर्जिन’, ‘द गर्ल नेक्स्ट डोअर’, ‘रोड ट्रिप’, ‘सेक्स ड्राइव्ह’ यांसारखे अनेक चित्रपट आले, परंतु प्रामुख्याने प्रेम, विनोद व रहस्यपटांच्या काळात किशोरवयीन मुलांच्या गंभीर समस्यांना विनोदी अंगाने वाट करून देणारा ‘द अमेरिकन पाय’ हा पहिला विनोदीपट होता. पुढे निर्माते ख्रिस मूर यांनी या चित्रपटाने मिळवलेले यश पाहता लैंगिक समस्यांवर आधारित ‘द अमेरिकन पाय २’, ‘अमेरिकन वेडिंग’, ‘अमेरिकन रियुनियन’ यांसारखी अ‍ॅडल्ट विनोदीपटांची मालिकाच सुरू केली. परंतु १९९९ सालचा ‘द अमेरिकन पाय १’ हा चित्रपट या पठडीतल्या इतर विनोदीपटांच्या तुलनेने विशेष गाजला.

थॉमस इयान निकोलस, टारा रीड व दिग्दर्शक ख्रिस वीट्झ या त्रिकुटाचा चित्रपटाच्या यशात सिंहाचा वाटा होता. अनेक वर्षांनंतर हे त्रिकूट एका मुलाखतीसाठी एकत्र आले. दरम्यान त्यांनी १८ वर्षांपूर्वीच्या आपल्या अनुभवांना पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिला. ख्रिस मूर यांनी जेव्हा या चित्रपटाची कल्पना मांडली तेव्हा त्यांना लिंगपिसाट या नावाने खिजवले गेले होते. अनेक मोठय़ा कलाकारांनी समाजातील आपली प्रतिष्ठा पाहून अ‍ॅडल्ट कॉमेडी करण्यास नकार दिला होता. थॉमस, टारा व ख्रिस या त्रिकुटानेही चित्रपटास थेट नकारच दिला होता. सर्वाच्या मते हा चित्रपट म्हणजे एक सेमी पॉर्न फिल्म होती. अभिनेत्री टारा रीडला त्यात कराव्या लागणाऱ्या न्यूड सीन्सची भीती वाटत होती. तर निकोलसला हा चित्रपट पाहून त्याचे आईवडील काय करतील?, ही भीती वाटत होती. ख्रिसला तर त्याच्यावर पॉर्न दिग्दर्शकाचा छापा पडू नये ही चिंता सतावत होती. परंतु शेवटी या तिघांनीही मुक्तपणे द्वयर्थी लैंगिक संभाषण असणाऱ्या या चित्रपटास होकार दिला.

चित्रपट प्रदर्शनादरम्यान प्रशासकीय विरोध व प्रेक्षकांच्या गोंधळाची भीती निर्मात्यांना सतावत होती, परंतु आश्चर्याची बाब म्हणजे चित्रपट सुपरहिट झाला. तरुण वर्गाच्या खास पसंतीस उतरला. आणि त्यानंतर अ‍ॅडल्ट कॉमेडीपटांचा जणू ट्रेंडच सुरू झाला. या मुलाखतीमुळे ‘द अमेरिकन पाय’ आज अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा चाहत्यांच्या चर्चेत आहे. या चित्रपट मालिकेतील विनोदी संभाषणांच्या क्लिप्स इंटरनेटवर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान चाहत्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत त्यातील कलाकारांकडे ‘द अमेरिकन पाय’च्या पुढच्या भागांची मागणीदेखील केली आहे.