उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यावर बंदी घालण्यात आली. याचा सर्वात मोठा फटका करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि हंसल मेहताच्या ‘रईस’ चित्रपटाला बसणार आहे. करण जोहरला त्याचा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेल्या अडचणींपैकी सर्वात मोठी अडचण म्हणजे या चित्रपटाचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन. या चित्रपटातील पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला विरोध करण्यात येत आहे. मात्र, फवाद व्यतिरिक्तही या चित्रपटाचे आणखी एक पाकिस्तानी कनेक्शन असून ते अद्याप चर्चेत आलेले नाही.
फवाद खानने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये त्याचे स्थान निर्माण करून लोकांची प्रशंसा मिळवली होती. त्याच्या प्रसिद्धीमुळेच त्याला ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रोमोजमध्ये स्थान देण्यात आले. मात्र, हीच गोष्ट आता निर्मात्यांच्या गळ्याशी आलेली आहे. उरी हल्ला आणि त्यानंतर झालेले सर्जिकल स्ट्राइक यानंतर पाकिस्तानी कलाकारांना होणारा विरोध आणखीनच वाढला आहे. फवाद खानमुळे या विरोधाचा पहिला फटका ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाला पडला. फवाद व्यतिरीक्त इमरान अब्बास हादेखील या चित्रपटात सहभागी आहे. इमरान हा पाकिस्तानी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा आहे. पण फवादच्या तुलनेत त्याची प्रसिद्धी कमी असल्यामुळे त्याला चित्रपटाच्या प्रोमोजमध्ये घेण्यात आले नाही. याच कारणामुळे त्याचे नावही चर्चेत आले नाही.
इमरान ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचा भाग असल्याचा पुरावा म्हणजे त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो. त्यात त्याने करण जोहर आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत चित्रीकरणावेळी काढलेला फोटो असे स्पष्ट म्हटले आहे.
फवाद खान चित्रपटात एका डीजेची व्यक्तिरेखा साकारत असून त्याची जोडी अनुष्का शर्मासोबत दाखविण्यात आली आहे. तर इमरान यात अनुष्काच्या भावाची व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे वृत्त होते. मात्र, इमरानने या वृत्ताचे खंडण केले होते. यात तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत असून निर्मात्यांशी केलेल्या करारामुळे तो आपल्या भूमिकेविषयी बोलणे टाळत असल्याचे कळते.
इमरान अब्बासने भट्ट कॅम्पच्या ‘क्रीचर ३डी’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यात बिपाशा बसूनेही मुख्य भूमिका साकारली होती. फवाद आणि इमरान व्यतिरिक्त या चित्रपटाचे आणखी एक पाकिस्तानी कनेक्शन म्हणजे यातील दोन्ही मुख्य अभिनेत्रींनी पाकिस्तानी व्यक्तिरेखा साकारलेली आहे. मात्र, आता या व्यक्तिरेखांची पार्श्वभूमी बदलण्यात आली असून ती लखनऊ करण्यात आली आहे. येत्या दिवाळीला ‘ऐ दिल है मुश्किल’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला विरोध करणा-या निर्मात्यांचे मत आता काहीसे बदलले असून चित्रपटाला हिरवा कंदील मिळावा म्हणून ते राजकीय पक्ष आणि नेत्यांची भेट घेत आहेत.