ऑनलाइन प्रेक्षका आवडे विनोद

एकेकाळी चित्रवाणीवर कॉमेडी शोचे पीक आले होते.

|| भक्ती परब

एकेकाळी चित्रवाणीवर कॉमेडी शोचे पीक आले होते. आताही हमखास टीआरपी देणाऱ्या या शोची निर्मिती थांबलेली नसली तरी त्याचा बहर छोटय़ा पडद्यावर तरी कमी झाला आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ‘स्टँड अप कॉमेडी’ प्रकारातील हे शो आता डिजिटलकडे वळले आहेत. एकतर त्यांचा सर्वात मोठा प्रेक्षक म्हणजे तरुणवर्ग  डिजिटलकडे वळला आहे, ही गोष्ट विनोदी कलाकारांच्या लक्षात आली. दुसरं म्हणजे केवळ रिअ‍ॅलिटी शोमध्ये किंवा एखाद दुसऱ्या ‘कपिल शर्मा शो’सारख्या शोमध्ये अडकून पडलेल्या या मंडळींना डिजिटलवर वेबसीरिज, यू-टय़ुब चॅनेल, अ‍ॅमेझॉन प्राइम-नेटफ्लिक्ससारखे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. सध्या याच माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या काही विनोदी कलाकारांशी बोलून ऑनलाइन माध्यम आणि विनोदी शो यांच्यातील घट्ट होत चाललेल्या या संबंधांमागची कारणे शोधण्याचा हा प्रयत्न..

डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्या वेगवेगळ्या शोजमधून कानन गिल, रोहन जोशी, तन्मय भट, अबिश मॅथ्यू, बिस्वा कल्याण, सुमुखी सुरेश, केनी सबॅस्टियन, सपन वर्मा असे अनेक नवनवे तरुण विनोदवीर प्रेक्षकांसमोर येत आहेत. ही यादी दिवसेंदिवस वाढत आहे आणि यातले प्रत्येक नाव आपल्या विनोदाच्या जोरावर घराघरात लोकप्रिय झाले आहे. छोटय़ा पडद्याकडे न वळता डिजिटलवरच आपली वाट शोधण्यामागची यांची कारणं नेमकी काय असावीत? या प्रश्नावर उत्तर देताना अ‍ॅमेझॉन प्राइमच्या ‘पुष्पवल्ली’ या वेबसीरिजमुळे लोकप्रिय झालेली सुमुखी सुरेश आपल्या या माध्यमापर्यंतच्या प्रवासाची कल्पना देते. मूळची नागपूरची पण दक्षिण भारतात शिक्षण झाल्यामुळे सुमुखी स्वत:ला तमिळ मानते. चेहरा नेहमी फ्रेश. आज ती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्टार आहे. आता स्टार असली तरी याआधी नोकरी करताना अनेक अडचणी होत्या. खाजगी आयुष्यातही बऱ्याच गोष्टींमुळे उलथापालथ झालेली होती. याच वळणावर तिला विनोदाची वाट सापडली. तिने विनोदी लेखन करून त्याचं सादरीकरण करायला सुरुवात केली. आणि बघता बघता तिचा चाहता वर्ग वाढू लागल्याचं सुमुखी सांगते. डिजिटलवर वेगाने पसरत चाललेल्या या विनोदी मालिकांच्या क्षेत्रात मुलींनी यायला हवं असं तिला वाटतं. ‘मुलींनी व्यक्त होण्यासाठी विनोदाचं माध्यम निवडलं पाहिजे. सुरुवातीला चुका होतील, प्रेक्षक तुम्हाला हसतील अशी भीती वाटेल, पण अडखळत का होईना सुरुवात तर करा’, असं आवाहनही सुमुखीने केलं. सुमुखी ‘अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’च्याच ‘कॉमिक्सस्तान’ या शोसाठी अबिश मॅथ्यूबरोबर सूत्रसंचालन करणार आहे. या प्लॅटफॉर्मवर ती एकाच वेळी अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शक अशा तीन आघाडय़ा लिलया सांभाळते आहे. तिला स्वत:ला तिची लेखणी सोडायची नाही. आणि विनोदी मालिकांबरोबरच पुढे काल्पनिक रहस्यमय कथा किंवा गुन्हेविश्वातील थरार मांडणारं लेखनही करायची इच्छा आहे. जी याच माध्यमातून पूर्ण होऊ शकते. त्यामुळे सुमुखी डिजिटलवर जास्त भर देते. सुमुखीप्रमाणेच विनोदी लेखनाला ज्याप्रकारचं स्वातंत्र्य मिळणं अपेक्षित असतं ते या माध्यमावर मिळत असल्याने कलाकार त्याकडे ओढले जात आहेत, असे मत सपन वर्मा या कलाकाराने व्यक्त केले.

सपन वर्मा ‘ईस्ट इंडिया कॉमेडी’ या स्टँड अप कॉमेडी ग्रुपमधून नावारूपाला आला आहे. मनाने हळवा असलेला सपन आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी भावूक होतो आणि त्या अनुभवातून त्याचा विनोद फुलतो. सपनच्या मते त्याची ही विनोदाची शैली तरुणाईला भावते. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ याच नावाने असलेल्या त्याच्या यू-टय़ुब चॅनेलचे करोडोच्या घरात चाहते आहेत. याविषयी सपन म्हणाला की, आपल्या मध्यमवर्गीय घरात एकच टीव्ही असतो. त्यावर आईला मालिका बघायच्या असतात आणि वडिलांना बातम्या. त्यामुळे तरुणाई ऑनलाइन माध्यमाकडे वळते. जिथे त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर, समस्यांवर चर्चा होते. जे घरात आपल्या पालकांसोबत बसून बघू शकत नाहीत. ते इथे पाहण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळतं. मुळात विनोद या कलेला स्वातंत्र्य हवं. त्यावर बंधनं असता कामा नयेत. बंधनं आली तर व्यक्त होण्याचं चांगलं माध्यम राहणार नाही, असं सपन म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे तरुण पिढीला नेहमीच चांगली गोष्ट सांगायची तर त्यांना तो उपदेश नको असतो. त्याऐवजी विनोदी, हलक्याफुलक्या चुटकुल्यांच्या रूपात सांगितलं तर त्यांना ते समजतंही आणि त्यांचं मनोरंजनही होतं. विनोद हे शिक्षणाचं प्रभावी माध्यम असल्याचंही तो म्हणतो. सपनने याआधी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या विषयावर एक विनोदी स्कीट केलं होतं. त्याला विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय विनोदी सादरीकरणासाठी एकच एक भावना हवी असं गरजेचं नाही, असं तो सांगतो. एकदा उबरने प्रवास करत असताना त्याला अतिशय भीतिदायक अनुभव आला होता. तो भीतिदायक अनुभवही त्याने विनोदी पद्धतीने सादर केला. त्यामुळे सादरीकरणातही प्रेक्षकांना वैविध्य मिळतं, त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराची शैली वेगळी, विषय वेगळा. त्यामुळे विनोदी जॉनर असला तरी वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन एकाच माध्यमावरून होत असल्याने तरुण त्याकडे जास्त ओढले जातात, असं मत वरून सपनने व्यक्त केलं.

‘एआयबी’मुळे नावारूपाला आलेला आणि त्यामुळे सतत वादातही सापडणाऱ्या कलाकारांमधलं मोठं नाव म्हणजे तन्मय भट. ‘एआयबी’ने डिजिटलपासून सुरुवात केली. लोकप्रियता मिळाल्यावर ते छोटय़ा पडद्यावरही आले. पण प्रेक्षकांचा प्रतिसाद जितका ऑनलाइनवर आहे तितका तो छोटय़ा पडद्यावर नाही हे तन्मय अनुभवावरून सांगतो. अर्थातच, डिजिटल माध्यमावर त्यांना पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये तरुणांचा टक्का अंमळ जास्त आहे हेही तो सांगतो. टीव्हीचे प्रेक्षक आणि ऑनलाइन प्रेक्षक यात काही प्रमाणात फरक आहे. पण आता जे टीव्ही बघतात ते सगळे प्रेक्षक ऑनलाइन येऊ  लागलेत. कारण चटकन कुठेही पाहता येईल असे हे सोपे माध्यम झाले आहे. ऑनलाइन प्रेक्षकांची संख्या टीव्ही बघणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा वाढली आहे, असा अहवाल अलीकडेच यू-टय़ुबने दिला याकडेही तन्मय लक्ष वेधतो. टीव्ही स्क्रीनची जागा मोबाइलची स्क्रीन घेणार, कारण ट्रेनने प्रवास करताना मोबाइलवर शो पाहणारा प्रेक्षक आता  जास्त आहे, असं तो म्हणतो. त्यामुळे सध्या तरी डिजिटल माध्यमाला प्राधान्य देणारा तन्मय ज्या दिवशी ऑनलाइनपेक्षा टीव्हीचा प्रेक्षक जास्त आहे असं लक्षात येईल तेव्हा आपलं काम बंद करेन, असंही गमतीत सांगतो. तन्मयनेही इतरांप्रमाणेच स्टँड अप कॉमेडियन म्हणून सुरुवात केली होती. आता तो ‘कॉमिक्सस्तान’ या शोमधून परीक्षक म्हणून नव्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मला सिद्धू पाजींसारखं परीक्षकाच्या खुर्चीवर बसायची खूप इच्छा होती. मस्त आसनावर बसायचं, विनोदवीरांना ऐकायचं आणि मनसोक्त हसायचं. आणि त्याचे आपल्याला पैसे मिळणार. स्पर्धकांचं परीक्षण करणं हे मजदुरीवालं काम नाही तर डोक्याने करायचं काम आहे. स्पर्धकांचं सादरीकरण बघून त्यावर आपलं मत देताना विचार करावा लागतो. कारण तो स्पर्धक, त्याचं भविष्य, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मनावर ते दडपण असतं आणि स्पर्धकाला योग्य प्रतिसाद देण्याची जबाबदारीही वाढते’, असं तो म्हणतो. टीव्ही आणि ऑनलाइन प्रेक्षक यांच्या मानसिकतेत काही फरक नाही, असं तो म्हणतो.

फरक हा फक्त सहजपणे कुठेही जोडलं जाण्याचा आहे, जे ऑनलाइन माध्यम करतंय. त्यामुळे हसवण्याचं आपलं काम हे या माध्यमावर वाढत चाललंय इतकंच.. असं तो स्पष्ट करतो. त्याच्या चाहत्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तरुण भारताचं चित्र पूर्ण व्हायचं असेल तर या विद्यार्थी वर्गाशी सातत्याने संवाद व्हायला हवा.. त्यांच्याच म्हणजे तरुणांच्याच माध्यमातून विनोद पुढे जाणार आहे, असा विश्वासही तन्मयने व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Online comedy