scorecardresearch

Oscar 2022 : पहिला ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या भारतीय महिलेचे नाव माहितीये का?

मृत्यूपूर्वी त्यांनी आपली ऑस्कर ट्रॉफी स्वत: जवळ न ठेवता अ‍ॅकॅडमी संस्थेला परत दिली होती.

कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. ९४ व्या ऑस्कर पुरस्काराच्या निमित्ताने भारताला सर्वात आधी हा सन्मान किती साली मिळाला आणि तो कोणी मिळवून दिला यावर आपण नजर टाकणार आहेत.

भारताला हा सन्मान सर्वात आधी मिळवून दिला तो भानु अथैया यांनी. प्रसिद्ध वेशभूषाकार भानु अथैया या ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या पहिल्या भारतीय कलाकार आहेत. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला होता. हा चित्रपट महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित होता.

Oscars Awards 2022 : काऊंटडाऊन सुरु! कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार सोहळा? वाचा सविस्तर

या चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच यात ओम पूरी, रोहिणी हट्टंगडी, सईद जाफ़री यांसारख्या अनेक भारतीय कलाकारांनी देखील काही महत्वाच्या भूमिकेत झळकले होते. पण हा चित्रपट बेन किंग्सले यांचा जबरदस्त अभिनय आणि भानु अथैया यांची वेशभूषा यामुळे विशेष गाजला.

या चित्रपटातील सर्व कलाकारांच्या कपड्यांचे डिझाइन्स या भानू अथैया यांनी तयार केल्या होत्या. अगदी गांधींनी नेसलेल्या सुती धोतरापासून कस्तुरबा गांधी यांच्या साडीपर्यंत सर्व काही वेशभूषाकार भानू अथैया यांच्या मार्गदर्शनाखालीच तयार करण्यात आले होते. या कामगिरीसाठी त्यांना १९८३ साली ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Oscars 2022 : ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत, ‘या’ चित्रपटाला मिळाले नामांकन

त्यानंतर २००१ साली आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटासाठी त्यांना पुन्हा एकदा ऑस्करचे नामांकन मिळाले होते. मात्र त्यांचा हा पुरस्कार थोडक्यात हुकला. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांसाठी वेषभूषाकार म्हणून काम केले आहे. यासाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.

दरम्यान भानू अथैया यांचे १५ ऑक्टोबर २०२० साली निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी आपली ऑस्कर ट्रॉफी स्वत: जवळ न ठेवता अ‍ॅकॅडमी संस्थेला परत दिली होती. भानू अथैया यांना त्यांच्या ट्रॉफीची खूप काळजी वाटतं होती. ती ट्रॉफी चोरीला जाईल किंवा त्यांच्या मृत्यूनंतर तिची योग्य काळजी घेतली जाणार नाही ही चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे २०१२ साली त्यांनी अॅकॅडमी संस्थेला ती ट्रॉफी परत केली. संस्थेने देखील हे सन्मानचिन्ह त्यांच्या संग्रहालयात ठेवलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Oscar 2022 do you know the name of the first indian woman to win an oscar award nrp

ताज्या बातम्या