बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्ढा प्रदर्शानापूर्वीपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रदर्शनाआधी अनेकांनी चित्रपटाला विरोध केला होता. तसेच चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणीही केली गेली होती. प्रदर्शनानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी जादू दाखवू शकलेला नाही. पण अशातच ऑस्कर अकादमीने मात्र या चित्रपटासाठी ट्वीट केल्याने हा चित्रपटात ऑस्करच्या शर्यतीत उतरणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. ऑस्कर अकादमीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ऑस्करचे ६ पुरस्कार मिळालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ आणि अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातील काही दृश्य दिसत आहेत. अकादमीच्या ट्वीटनंतर हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरीही याची अद्याप पुष्टी झालेली नाही. अकादमीने शेअर केलेल्या या व्हिडीओतून केवळ दोन्ही चित्रपटातील समानता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आणखी वाचा- अजित पवार यांची आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर प्रतिक्रिया, म्हणाले “चित्रपट बॉयकॉट करावा असं…”

‘लाल सिंग चड्ढा’चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना अकादमीने लिहिलं, ‘रॉबर्ट गेमेकिस आणि एरिक रॉथ यांच्या कथेनं जग बदलून टाकलं होतं. आता अद्वैत चंदन आणि अतुल कुलकर्णी यांनी यावर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. फॉरेस्ट गम्पमध्ये टॉम हँक्सनं साकारलेली भूमिका ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर खाननं साकारली आहे.’ हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ने १३ पैकी ६ ऑस्कर पुरस्कार जिंकले होते. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता.

दरम्यान आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाबद्दल बोलायचं तर, हा चित्रपट ११ ऑगस्टला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. आतापर्यंत चित्रपटाची कामगिरी पाहता आमिर खान चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला आहे, असं म्हटलं जातंय. आमिर खानने चार वर्षांनंतर या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या चित्रपटात आमिर खान व्यतिरिक्त करीना कपूर खान, मोना सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.