राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांची उपस्थिती

ऑस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत.

john bailey
जॉन बेली
येत्या २६ मे रोजी होणा-या ५६ व्या राज्य राठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्कर अकादमीचे विद्यमान अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे सायंकाळी ६.३० वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

याविषयी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, ‘ऑस्करच्या स्थापनेपासून ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष यापूर्वी कधीच भारतात आले नव्हते. ऑस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत. हे प्रथमच घडत असावे. ऑस्कर अध्यक्षांना निमंत्रित करुन मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्या मार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे.’

जॉन बेली हे गेली २ वर्षे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष आहेत. ऑस्कर अकादमीच्या सिनेमॅटोग्राफर विभागातून त्यांची ही निवड झाली आहे. १९७१ ते २०१७ पर्यंत वेगवेगळ्या ७० हून अधिक हॉलिवूड चित्रपटांचे त्यांनी छायाचित्रण केले. तसेच हॉलिवूड चित्रपटांसाठीही त्यांनी दिग्दर्शनही केले आहे. येत्या १९ मे रोजी आयोजित केलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये बेली यांचा विशेष गौरव होणार आहे.

ऑस्करचे अध्यक्ष जॉन बेली २५ मे व २६ मे असे दोन दिवस मुंबईत येत आहेत. या दोन दिवसांत बेली महाराष्ट्र मराठी चित्रपट सोहळ्याला उपस्थित राहणार आहेतच. पण त्याव्यतिरिक्त चित्रपट सृष्टीतील संबंधितांची मान्यवरांची भेट घेणार आहेत असेही तावडे यांनी सांगितले. बेली यांच्या मुंबई भेटीचा मोठा लाभ मराठी चित्रपट सृष्टीला तर होईलच पण देशातील सर्वच चित्रपटसृष्टीलाही याचा सकारात्मक लाभ होऊ शकेल असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे ५६वे वर्ष आहे. चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्याचप्रमाणे व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर विशेष योगदान जीवन गौरव पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराचे वितरण सुध्दा २६ मे रोजी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Oscar president john bailey invited as chief guest at maharashtra film festival this year