इराणी दिग्दर्शक असगर फरहादी यांचा ऑस्करमध्ये मानांकन मिळालेला ‘द सेल्समन’ हा सिनेमा आता ३१ मार्चला भारतात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाने ऑस्करमध्ये परदेशी भाषा विभागात सर्वोत्कृष्ट सिनेमाचे पारितोषिक मिळवले होते.

या सिनेमाला भारतात सुनील दोषी प्रेझेंट्स यांच्या तर्फे प्रदर्शित करण्यात येणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतात प्रत्येक वर्षी नवनवीन सिनेमे आणण्यासाठी ही सुरुवात करण्यात आली आहे. ‘द सेल्समन’ला गेल्या वर्षी कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता यासाठी पारितोषिक मिळाले होते. या सिनेमाची कथा एका जोडप्याभोवती फिरते. हे जोडपे तेहरानमध्ये एका नवीन फ्लॅटमध्ये राहायला जातात. त्या घरी आधी राहणाऱ्या व्यक्तिशी संबंधित घटनेमुळे या जोडप्याचे आयुष्य बदलून जाते. फरहादी यांचा २०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द सेपरेशन’ या सिनेमालाही ऑस्करचे पारितोषिक मिळाले होते.

दरम्यान, या ऑस्कर सोहळ्यात फरहादी यांनी बहिष्कार टाकला होता. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इराणी दिग्दर्शक असगर फरहादी यांच्या ‘द सेल्समॅन’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट विदेशी सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. पण ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध दर्शवत असगर फरहादी यांनी सोहळ्यात जाऊन पुरस्कार घेण्यास नापसंती दर्शवली होती. त्यांच्यावतीने व्यासपिठावर गेलेल्या प्रतिनिधीने, त्यांनी लिहिलेले एक पत्र यावेळी वाचून दाखवले होते. त्या पत्रात असगर यांनी ट्रम्प सरकाची निंदा केली होती.

irani-director

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२० दिवसांसाठी शरणार्थी असलेल्यांना अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. तसेच इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सूडान आणि यमन यांसारख्या देशातील नागरीकांना ९० दिवसांसाठी अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्यात आली होती. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर फरहादी यांचे हे स्पष्टीकरण आले होते.