लायन’ चित्रपटात लहानग्या सरूची भूमिका साकारुन जगभरातील सिनेरसिकांना प्रेमात पाडणाऱ्या मुंबईकर सनी पवार बुधवारी मायदेशी पोहोचला. ८९व्या ऑस्कर पुरस्कारात भारतीयांची मान उंचावणारा सनी बुधवारी सकाळी मुंबईत दाखल झाला. ‘मी ऑस्कर सोहळ्याच्या व्यासपीठावर खूप मजा केली. सध्या मी खूप आनंदी असून या पुरस्कारावेळी व्यासपीठावरील उपस्थिती अविस्मरणीय होती’, असे सनी पवारने मुंबई विमानतळावर दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. सनीच्या ऑस्करवारीविषयी पीटीआयशी बोलताना सनीचे आजोबा भिमा पवार म्हणाले की, ‘सनीने मारलेली मजल आनंद देणारी आहे. तो एक स्वप्नवत अनुभवच होता. आम्ही काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्या उपस्थितीत पार पडलेला हा ऑस्कर सोहळा पाहू शकलो नाही’, पण हा सोहळा लवकरच पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सनी पवारने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर हजेरी लावली. यावेळी मुंबईकर सनीचे उद्धव ठाकरेंचे पुत्र अदित्य ठाकरे यांनी पेढा भरवून तोंड गोड केल्याचे पाहायला मिळाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनी पवार कुटुंबियांसोबत उद्धव यांच्या भेटीसाठी पोहचला होता. ऑस्करच्या रेड कार्पेटवर सर्वांचेच लक्ष वेधणाऱ्या या छोट्या जादूगार अर्थात सनी पवारचे मातोश्रीवर खास स्वागत करण्यात आले. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार समारंभ सोहळ्यात सनी पवारची जादू पाहायला मिळाली होती. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याऱ्या जिमी किमेलने सनी पवारशी खास संवाद साधल्याचेही पाहायला मिळाले होते. अमेरिकेतील दिग्गज मंडळींच्या उपस्थित जिमीने विचारलेल्या प्रश्नांची सनीने मजेदार पद्धतीने उत्तरे दिली होती. सर्वसाधारण आठ वर्षांच्या मुलाप्रमाणेच दिसणारा सनी आज मात्र आंतरराष्ट्रीय ‘स्टार’ कलाकार आहे. त्याने ‘लायन’ चित्रपटात केलेली सरूची भूमिका चित्रपटाची मोठी जमेची बाजू होती असे समीक्षकांनीही मान्य केले आहे.

ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गार्थ डेव्हिसच्या ‘लायन’ या चित्रपटाला ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी सहा नामांकने मिळाली होती. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता (देव पटेल), सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री (निकोल किडमन) आणि सर्वोत्कृष्ट पटकथा (सरू ब्रायरर्ली यांचे ‘अ लाँग वे होम’) यासह आणखी दोन विभागात चित्रपटाला नामांकने मिळाली. यापैकी कोणत्याही वर्गवारीत लायन चित्रपट आपला ठसा उमटवण्यास अपयशी ठरला होता. या नामांकनांमध्ये सनीचा उल्लेख नसेला तरी ‘लायन’ चित्रपटातील लहानग्या सरूची भूमिका साकारणाऱ्या छोटय़ा सनी पवार या मुंबईकराच्या सर्वच जण प्रेमात पडल्याचे दिसते. या चित्रपटात देव पटेल याच्या लहानपणाची व्यक्तीरेखा सनीने साकारली होती. एखाद्या कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे त्याने सनीने त्याच्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती.