scorecardresearch

नवा नायक

‘‘आजचा जमाना हा कथांचा आहे. प्रेक्षकांना जितक्या कथा पाहायला आणि अनुभवायला मिळतील त्याप्रमाणे प्रेक्षक त्या कथांना भरभरून प्रतिसाद देतात.

नवा नायक

|| गायत्री हसबनीस

ओटीटी हे माध्यम आले आणि सिनेमाविश्वाचे नवे पर्व सुरू झाले याचे कारणही तसेच की, सिनेमा सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित न होता सरळ ओटीटी माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. एका क्लिकवर अब्जावधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांची वाहवाही मिळते आणि टीकाही सोसावी लागते. अशा माध्यमातून एकाच वेळी विविध देशांत तुम्ही पोहोचता तेव्हा मिळणारी  कौतुकाची थाप ही आश्चर्याचा सुखद धक्का देणारी असते, असं नव्या दमाचा अभिनेता सनी कौशल सांगतो. त्याचा ‘शिद्दत’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला असून नायक म्हणून सनीच्या अभिनयावरही प्रेक्षकपसंतीची मोहोर उमटली आहे.

मुख्य नायक म्हणून हा अभिनेता सनी कौशलचा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी त्याने ‘गोल्ड’, ‘भंगरा पा ले’ अशा चित्रपटांतूनही लक्षवेधी भूमिका के ल्या आहेत, पण ‘शिद्दत’ची प्रेमकथा आणि वेगळी धाटणी यामुळे त्याला यश मिळाले आहे. सनीने साकारलेल्या भूमिकाही फार वेगळ्या धाटणीच्या होत्या. ‘गोल्ड’मधला हिम्मत सिंग, ‘द फर्गोटन आर्मी: आजादी के लिए’मधला सोधी आणि खुद्द ‘शिद्दत’मधला जग्गी. आजच्या काळात जिथे हरएक प्रकारच्या नवनवीन कथा आणि कथेतील व्यक्तिरेखेला प्रेक्षक पटकन स्वीकारतात तिथे कलाकारांपुढील आव्हानही वाढते, हे सनी कबूल करतो. ‘शिद्दत’मधल्या ‘जग्गी’ या व्यक्तिरेखेशी प्रेक्षक जसे जोडले गेले तसा मीही कथा वाचल्यानंतर जोडला गेलो होतो. एरवी कुठलीही कथा स्वीकारताना मी तटस्थ राहतो म्हणजेच कोणत्याही चित्रपटातील कथेतून लेखक- दिग्दर्शक प्रेक्षकांना काय सांगू इच्छितो आहे व त्याच्याशी मी जोडला जातोय की नाही याकडे मी अधिक लक्ष देतो. त्यानंतर व्यक्तिरेखा किती मनोरंजक आहे याचा विचार मी करतो, कारण कुठलीही भूमिका निवडताना जर ती मला पटली तरच प्रेक्षकांपर्यंत सहजतेने पोहोचू शकते म्हणून कथा आणि भूमिका निवडताना मी प्रेक्षकांचाही विचार करतो, असं तो मनमोकळेपणाने सांगतो. निर्माते दिनेश विजन यांना भेटायला गेलो असताना त्यांनी या चित्रपटाची कल्पना दिली. वेगळ्या धाटणीच्या या प्रेमकथेचं दिग्दर्शन कुणाल देशमुख करत होते. त्यांनी चित्रपटाची कथा ऐकवली आणि मी होकार दिला, असं सनी सांगतो.

‘‘आजचा जमाना हा कथांचा आहे. प्रेक्षकांना जितक्या कथा पाहायला आणि अनुभवायला मिळतील त्याप्रमाणे प्रेक्षक त्या कथांना भरभरून प्रतिसाद देतात. त्याबरोबरच सिनेमाचा आशय हा भयपटाचा असो किंवा चरित्रपटाचा असो… मला हरतऱ्हेच्या शैलीतील चित्रपट करायला आवडेल, मी स्वत:वर कुठलेच बंधन ठेवलेले नाही,’’ असं म्हणत आजचा प्रेक्षक हा खूप वास्तववादी असल्याचे निरीक्षणही त्याने नोंदवले. आज व्यावसायिक चित्रपटही तेवढ्याच ताकदीने तिकिटबारीवर चालतात जेवढे समांतर चित्रपट चालतात. त्यामुळे अमुकच एका पठडीतले सिनेमे करायचे असे आपण काहीच ठरवले नसल्याचेही तो सांगतो. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे आणि आजचा प्रेक्षकही बदलतो आहे. कलाकार समाजातले हेच बदल त्यांच्यापुढे मांडत असतो. प्रेक्षक अगदी बारकाईने हे बदल हेरतो. कलाकार प्रेक्षकांना फक्त एकच गोष्ट सतत दाखवत राहिला तर प्रेक्षक ते पाहणार नाहीत. तेव्हा अशा वेळी प्रेक्षकच ठरवतात की, त्यांना काय पाहायचे आहे ते. त्यामुळे कलाकारालाही प्रेक्षकांसाठी बदलावे लागते,’’ असे ठाम मत सनीने व्यक्त केले. सनीचा ‘हूरदांग’ नामक आगामी चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहितीही त्याने दिली.

‘शिद्दत’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे खरं तर मी खूपच भारावून गेलो आहे. ओटीटी या माध्यमामुळे प्रेक्षक तुमच्याशी जास्त जोडले जातात. ‘शिद्दत’बद्दलच सांगायचं झालं तर मला चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर समाजमाध्यमांवरून तुफान प्रतिक्रिया आल्या. त्यावरून हे जाणवलं की, प्रेक्षक तुमचे चित्रपट आवर्जून पाहतात आणि त्यांना तो आवडला किंवा नाही आवडला याबद्दल ते अगदी खरी प्रतिक्रिया व्यक्त करतात. या माध्यमांचा कलाकारांना खूप फायदा होतो आहे. आमचं काम थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं, तसं त्यांची मतंही आमच्यापर्यंत थेट पोहोचतात. संवादाची एक वेगळीच देवाणघेवाण होते आहे.

गेली दोन वर्षे मीही चित्रपटगृह सुरू होण्याची वाट पाहतोय. चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणं ही तर आपली भारतीय संस्कृती आहे. ओटीटी हे माध्यम आता चित्रपटासाठी असले तरी चित्रपटगृहात जो एकत्रित माहौल तयार होतो, त्याचा आनंद इतर कुठल्याही ठिकाणी नाही. अर्थात, ओटीटीचा पर्याय नसता तर सिनेसृष्टीची स्थिती खूपच वाईट असती. आता लवकरच चित्रपटगृह सुरू होतायेत आणि मला खात्री आहे की, प्रेक्षक चित्रपटगृहाकडे नक्कीच परत वळणार. चित्रपटगृह सुरू होताना त्याची आर्थिक आणि इतर गणितं काय असतील याची मला कल्पना नाही, परंतु प्रेक्षकांसह मीही आता चित्रपटगृह सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहतो आहे.

तरुणाईचा आवडता अभिनेता विकी कौशलचा सख्खा भाऊ म्हणून सनी कौशलची आजवरची ओळख आहे. ही ओळखही आनंदाची असली तरी अभिनेता म्हणून त्याला स्वत:ची वेगळी ओळख इंडस्ट्रीत निर्माण करायची आहे, असं तो सांगतो. सर्वसामान्य भावंडांप्रमाणेच विकीशीही आपलं नातं तितकं च घट्ट असल्याचं तो सांगतो. एकमेकांच्या कामाबद्दल प्रेम आणि आदर असल्याचं सांगतानाच आम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत काम करायची इच्छा आहे.

सनी कौशल

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 01:43 IST

संबंधित बातम्या