Movie Releases This Week : यंदाचा आठवडा चित्रपटप्रेमींसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन आला आहे. मोठ्या पडद्यापासून ते ओटीटीपर्यंत एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. थ्रिलर, फॅमिली ड्रामा, अॅक्शन व रोमँटिक असे विविध धाटणीचे सिनेमे या आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याने मनोरंजनप्रेमींसाठी हा आठवडा खास ठरणार आहे. या आठवड्यात एखादा भन्नाट सिनेमा पाहण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्या वॉच लिस्टमध्ये हे सात चित्रपट नक्कीच असायला हवेत.

‘उयिर’

रहस्यमय आणि पोलिस तपास यांवर आधारित असलेला ‘उयिर’ सिनेमा या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. पद्मकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमामध्ये जबरदस्त थ्रिलर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची गोष्ट थरारक आणि उत्कंठावर्धक असून, प्रत्येक टप्प्यावर नवे धक्कादायक खुलासे होत जातात. अनपेक्षित ट्विस्टमुळे हा सिनेमा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलर अशा प्रकारचे सिनेमा आवडणाऱ्यांसाठी ‘उयिर’ हा चित्रपट उत्तम पर्याय ठरू शकतो. ‘उयिर’ ४ ऑगस्टला जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

ऑपरेशन सफेद सागर

भारतीय सैन्याची कथा पुन्हा एकदा पडद्यावर मांडली जाणार आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने राबवलेल्या ऐतिहासिक कामगिरीवर आधारित ‘ऑपरेशन सफेद सागर’ सीरिज रिलीज होणार आहे. खऱ्या कथेवर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये जिमी शेरगिल, सिद्धार्थ आणि इतर दमदार कलाकारांच्या भूमिका असणार आहेत. युद्धातील धाडसी मोहिमा, सैनिकांचं शौर्य आणि देशासाठी दिलेलं बलिदान या सिनेमामध्ये प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. ‘ऑपरेशन सफेद सागर’ ही बहुप्रतीक्षित वॉर ड्रामा सीरिज ७ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.

मैं वापस आऊंगा

दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मैं वापस आऊंगा’ या सिनेमाने चित्रपट समीक्षकांचे लक्ष वेधले होते. थिएटरमध्ये या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता रोमँटिक ड्रामा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नसिरुद्दीन शाह, दिलजीत दोसांझ, शर्वरी वाघ व वेदांग रैना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेम, नातं आणि त्यातील भावनिक संघर्षाची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट ७ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

ओह माय डॉग

अमित राय यांनी दिग्दर्शित केलेला ‘ओह माय डॉग’ हा सिनेमा काही दिवसांपासून जोरदार चर्चेमध्ये आहे. प्राणीमित्रांसाठी पर्वणी असणाऱ्या या सिनेमाची गोष्ट ही एका श्वानाभोवती फिरते. या चित्रपटात माणूस आणि प्राणी यांच्यातील नाते भावनिक पद्धतीने मांडण्यात आले आहे. समाजाला महत्त्वपूर्ण संदेश देणारा हा चित्रपट श्वानप्रेमींसाठी खास ठरणार आहे. या सिनेमातून प्राण्यांविषयी प्रेम व संवेदनशीलता प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. त्यामध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत झळकणार असून, ‘ओह माय डॉग’ ७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आर्यभट्ट का जीरो

‘यारियां’ चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता हिमांश कोहली आता ‘आर्यभट्ट का जीरो’ या चित्रपटातून पुन्हा एकदा पुनरागमन करीत आहे. दिग्दर्शक कमल चंद्रा यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात मध्यमवर्गीय कुटुंबातील एक २५ वर्षीय तरुणाची गोष्ट मांडण्यात आली आहे. संघर्ष आणि आत्मविश्वास यांवर आधारित चित्रपट प्रेरणादायी आहे. शून्यला किंमत असल्याची भावना यांतून मांडण्यात आली आहे. अभिनेता हिमांश कोहलीच्या या पुनरागमनाकडे चाहत्यांचं विशेष लक्ष लागलं असून, चित्रपटाचीही उत्सुकता वाढली आहे. ‘आर्यभट्ट का जीरो’ चित्रपट ७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लेनिन

दाक्षिणात्य अभिनेता अखिल अक्किनेनी यांचा ‘लेनिन’ चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळविल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. नुकतीच निर्मात्यांनी सिनेमाच्या ओटीटी प्रदर्शनाची घोषणा केली असून, ७ ऑगस्टपासून हा चित्रपट झी5 वर पाहता येणार आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता, न आलेल्या प्रेक्षकांना आता घरबसल्या ओटीटीवर ‘लेनिन’ पाहता येणार आहे.

स्टर्लिंग पॉईंट

हॉलीवूड वेब सीरिज पाहण्याची इच्छा असेल, तर ‘स्टर्लिंग पॉईंट’ हा फॅमिली ड्रामा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामध्ये एका वडिलांनी जुळ्या मुलांना दत्तक घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडणारे भावनिक बदल, जबाबदाऱ्या आणि त्यांना सामोरं जावं लागणाऱ्या आव्हानांची कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. नातेसंबंध, प्रेम आणि कुटुंबातील भावनिक गुंतागुंत यांचं वास्तव मांडण्यात आलं आहे. ‘स्टर्लिंग पॉईंट’ ही फॅमिली ड्रामा वेब सीरिज ५ ऑगस्टपासून ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.