Tamil Movie Trends At No 1 On OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. पण, काही चित्रपट आपल्या वेगळ्या शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशाच एका चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.

या चित्रपटाने बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मवर पहिले स्थान पटकावले आहे. ‘टोस्टर’ आणि ‘धुरंधर’सारख्या बिग बजेट चित्रपटांनाही त्या चित्रपटाने मागे टाकले आहे.

नेटफ्लिक्सवर सध्या ज्या चित्रपटाची चर्चा आहे, त्याचे नाव आहे ‘यूथ’. हा एक तमीळ रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून, सध्या तो नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर आहे. मूळचा तमीळ असलेल्या या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड अशा पाच भाषांमध्ये १६ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आले. तेव्हापासून हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.

केन करुणास यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘यूथ’ चित्रपटात एका शालेय मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो आपल्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो. केन यांनी या चित्रपटात दिग्दर्शनाबरोबरच मुख्य अभिनेत्याची भूमिकाही साकारली आहे. जर तुम्हाला रोमँटिक कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असेल, तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल.

‘यूथ’ने कमावले तब्बल ५० कोटी

अवघ्या सहा कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाने ७१.३३ कोटी कमावले आहेत. तज्ज्ञांच्या मते, आपल्या खर्चाच्या तुलनेत अनेक पटींनी नफा कमावणारा हा चित्रपट २०२६ मधील सर्वांत यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. सुमारे दोन तास २० मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. IMDb वरसुद्धा ‘यूथ’ या चित्रपटाला ७.१ रेटिंग आहे.

‘यूथ’ चित्रपटामधील कलाकार

केन करुणासबरोबरच सूरज वेंजरामूडू, देवदर्शिनी, अनिष्मा अनिलकुमार आणि प्रियांशी यादव या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एखादा हलका-फुलका चित्रपट पाहायचा असेल, तर ‘यूथ’ हा एक उत्तम चित्रपट आहे.

सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत असलेल्या टॉप-१० चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे

  • १. यूथ
  • २. टोस्टर
  • ३. दो दीवाने शहर में
  • ४. उस्ताद भगत सिंह
  • ५. तू या मैं
  • ६. त्रैश
  • ७. धुरंधर
  • ८. मर्दानी ३
  • ९. १८०
  • १०. वध २