Sitaare Zameen Par OTT Announcement : आमिर खानच्या काही लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘तारे जमीन पर’. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. २००७ मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’चा गेल्यावर्षी ‘सितारे जमीन पर’ हा सीक्वेल आला. आर. एस. प्रसन्न दिग्दर्शित हा चित्रपट जून २०२५ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे.
‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हे यात मुख्य भूमिकांत आहेत. कथेसाठी आणि कलाकारांच्या अभिनयासाठीही चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झालं.
चित्रपटगृहांत बघता न आलेले प्रेक्षक हा सिनेमा ओटीटीवर कधी येतोय, याची वाट बघत होते आणि अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘सितारे जमीन पर’ अखेर एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आता हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार, याबद्दल जाणून घेऊ…
ओटीटीवर येणार ‘सितारे जमीन पर’
सितारे जमीन पर’ हा SonyLIV वर पाहता येणार आहे. SonyLIV ने दिलेल्या माहितीनुसार, ‘सितारे जमीन पर’ हा SonyLIV वर थेट प्रदर्शित होणारा पहिलाच हिंदी चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे SonyLIV साठी हा एक चित्रपटाच्या ओटीटी प्रीमियरसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
चित्रपटगृहांत रिलीज झाल्यानंतर महिनाभराने, आमिरने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याऐवजी वेगळा प्रयोग केला. त्याने हा चित्रपट त्याच्या YouTube वरील ‘Aamir Khan Talkies’ या चॅनेलवर पे-पर-व्यूद्वारे रिलीज केला. यामध्ये प्रेक्षकांना १०० रुपये भरून चित्रपट पाहता आला. त्यावेळी आमिर खानने सिनेमा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि डिजिटल प्रीमियरच्या नव्या पद्धतीचा प्रयोग करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.
“Aamir Khan Productions हे माझं स्वतःचं सिनेमाघर आहे असं समजा. मी हे एक नवं सिनेमाघर सुरू केलं आहे, जे प्रत्येकाच्या घरात आणि खिशात आहे. मला ओटीटी प्लॅटफॉर्मकडून चांगल्या ऑफर्स आल्या होत्या. पण मला त्यांच्याकडून १००-१२५ कोटी रुपये घ्यायचे नव्हते. मला माझ्या प्रेक्षकांकडून १०० रुपये कमवायला जास्त आवडेल”, असं तो म्हणाला होता.
चित्रपटगृह आणि YouTube नंतर आता हा चित्रपट आणखी जास्त प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचावा म्हणून तो ओटीटीवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट लवकरच SonyLIV वर स्ट्रीम होणार आहे. “एक बास्केटबॉल कोच, १० खेळाडू आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास… ‘सितारे जमीन पर’… लवकरच सोनी लिव्हवर” असं म्हटलं आहे. मात्र या चित्रपटाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची कथा काय?
हा चित्रपट गाजलेल्या स्पॅनिश चित्रपट Champions चा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खानने गुलशन अरोरा नावाच्या बास्केटबॉल टीमच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याबद्दल त्याला शिक्षा दिली जाते. त्याला तुरुंगवास भोगणे किंवा ९० दिवसांची कम्युनिटी सर्व्हिस करणे, असे दोन पर्याय दिले जातात. या कम्युनिटी सर्व्हिसमध्ये त्याला दिव्यांग तरुण बास्केटबॉल खेळाडूंच्या टीमला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दिली जाते, अशी या चित्रपटाची कथा आहे.
‘सितारे जमीन पर’मधील कलाकार
या चित्रपटात आमिर खानसह जिनिलीया देशमुख, आशीष पेंडसे, अरौश दत्ता, आयुष भन्साली, ऋषी शाहनी, गोपीकृष्णन के. वर्मा, ऋषभ जैन, वेदांत शर्मा, सिमरन मंगेशकर, संवित देसाई आणि नमन मिश्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
