बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खानने ३१ व्या वर्षी अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्याचा ‘महाराज’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २१ जून रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा आधी १४ जूनला आधी प्रदर्शित होणार होता, पण चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावणारा असू शकतो, असं म्हणत त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गुजरात हायकोर्टाने प्रदर्शनावर स्थगिती आणली, पण चित्रपट पाहिल्यानंतर त्यात काहीच आक्षेपार्ह नसल्याचा निवाडा न्यायमूर्ती संगीता विशेन यांनी दिला आणि तो एक आठवडा उशिरा प्रदर्शित झाला. या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी असली तरी आमिरच्या मुलाने याद्वारे पदार्पण केल्याने या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. तर हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊयात.

चित्रपटाची कथा करसनदास मुळजीच्या जन्मापासून सुरू होते. वैष्णव धर्मातील एका रुढीप्रिय गुजराती कुटुंबात करसनदाचा जन्म होतो, त्याला लहान असल्यापासून अनेक प्रश्न पडत असतात. आई-वडिलांबरोबर मंदिरात गेल्यावर मंदिरातील भटजींना देवाचा पत्ता माहित आहे का? देवाला गुजराती बोलता येतं का? असे प्रश्न तो विचारताना दिसतो. आईचं निधन होतं आणि मग १० वर्षांचा करसन त्याच्या मामाच्या घरी तेव्हाच्या बॉम्बेमध्ये पोहोचतो.

“मला माहित आहे की माझ्यात…”, पदार्पणाच्या ‘महाराज’ चित्रपटात स्वतःच्या कामाचा आमिर खानच्या मुलाने केला रिव्ह्यू

करसनदासची भूमिका जुनैद खानने केली आहे. त्याचे मामा जिथं राहतात तिथल्या मोठ्या हवेलीचा धर्मगुरू जादूनाथ असतो. त्याला लोक जेजे म्हणतात. जादूनाथची भूमिका जयदीप अहलावतने केली आहे. होळीचा दिवस असतो, आजूबाजूचे लोक मोठ्या हवेलीत जमतात. याठिकाणी करसनदास व त्याची होणारी बायको किशोरी (शालिनी पांडे) डान्स करतात. डान्स पाहिल्यानंतर जेजे किशोरीला चरणसेवेसाठी निवडतो. इतक्या भक्तांपैकी आपली निवड झाली म्हणून किशोरी खूप आनंदी असते. ती चरणसेवेसाठी जाते आणि तिथे धर्मगुरू चरणसेवेच्या नावावर तिचं शोषण करतो. हे घडत असताना करसनदास तिथे पोहोचतो आणि किशोरीला सोबत चलायला सांगतो पण लहानपणापासून जेजेला देव मानणारी किशोरी सुशिक्षित असूनही सोबत जायला नकार देते. यानंतर करसनदास तिच्याशी लग्न मोडतो.

लहानपणापासून प्रश्न विचारणारा करसन इथे आपल्या धर्मगुरुलाच प्रश्न विचारू लागतो. किशोरीबरोबर जे घडलं ते नंतर तिच्याच लहान बहिणीबरोबर घडणार असतं तेव्हा तिचे डोळे उघडतात. त्यानंतर तिने आत्महत्या करणं, तिच्या मृत्यूचा धक्का बसल्यानंतर करसनचं स्वतःचं पत्रक सुरू करून त्यात जेजेवर गंभीर आरोप करून लेख छापणं सुरू होतं. अशाच प्रसंगात त्याच्या आयुष्यात विराजच्या भूमिकेत शर्वरी वाघची एंट्री होते. दुसरीकडे जेजे महाराज करसनवर मानहानीचा खटला दाखल करतात आणि मग कोर्ट ड्रामा सुरू होतो.

२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

या चित्रपटाची कथा खरं तर दमदार आहे. अस्पृश्यता, विधवांना त्या काळी दिली जाणारी वागणूक याबद्दल सिनेमात चपखल भाष्य करण्यात आलं आहे. समाजसुधारक व पत्रकार करसनदास मुळजी यांचा जीवनप्रवास व महाराजांवर झालेल्या आरोपांवरचा हा खरा कोर्ट ड्रामा आहे. पण चित्रपट पाहताना काही गोष्टी खटकतात. जर सिनेमातील काळ हा १८६० च्या आसपासचा आहे तर त्यावेळी महिलांना पडदा पद्धत असताना गर्दीत करसन आणि किशोरीचा रोमान्स दाखवणं खटकतं. एकीकडे विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न करणारा व पडदा पद्धतीचा विरोध करणारा करसन तिच्याबरोबर जो प्रसंग घडतो त्यानंतर किशोरीला समजावण्याचा प्रयत्नच करताना दिसत नाही. करसनला लहानपणापासून प्रश्न विचारण्याची सवय आहे, पण ती सवय का लागली, त्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या, आजूबाजूची परिस्थिती काय होती, घरात त्याच्यावर कसे संस्कार झाले, याबद्दल काहीच चित्रपटात दाखवण्यात आलं नाही. व्हॉइसओव्हरच्या मदतीने चित्रपट पुढे सरकवण्यात आला आहे. असं वाटतं जणू अचानक एका घरात एक वेगळ्या विचारसरणीचा करसन जन्म घेतो आणि त्याला चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टींवर तो बोलतो.

“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

या चित्रपटाचा पूर्ण केंद्रबिंदू करसनदासवर आहे. जेजेचा लोकांवर प्रभाव का आणि केवढा आहे, हेही सिनेमात दिसत नाही. एका सीनमध्ये जेव्हा जेजे हवेली बंद करण्याचा निर्णय घेतो तेव्हा करसनदास देवाचा एक फोटो चौकातील झाडाखाली ठेवतो आणि लोकांना ते हवेलीत देवाचे दर्शन न घेताही राहू शकतात हे पटवून देतो आणि ती जमलेली गर्दी लगेच ऐकते. विराज तर तिथे त्या गर्दीत चक्क करसनदाससाठी शिट्टी वाजवते. जर, त्यांच्यावर जेजेचा इतका प्रभाव आहे, तर त्यातलं कोणीच विरोध कसं करत नाही, असा प्रश्न लगेच पडतो. जे लोक जेजेचं इतकं ऐकतात, तेच पुढच्या मिनिटाला करसनदास बोलला की त्याचंही सहज ऐकतात. पुढे कोर्टात सुनावणी सुरू असतानाही जेजेच्या समर्थनासाठी जमलेली गर्दी शांतच असते. त्यामुळे दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्राने विषयाचं गांभीर्य दाखवण्यासाठी फारशी मेहनत घेतलेली दिसत नाही. करसनदावर दादाभाई नौरोजी यांचा प्रभाव होता, पण चित्रपटात त्यांच्या पात्राला मोजकाच स्क्रीन टाइम देण्यात आला आहे.

कलाकारांचा अभिनय ही जमेची बाजू आहे. या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणारा जुनैद नवखा आहे हे बऱ्याच ठिकाणी जाणवतं. संवादफेक करताना त्याची देहबोली, आखडलेलं शरीर, जोरात बोलताना आवाज कापरा होणं आणि हिंदी शब्दांचे उच्चार यात बरीच सुधारणा असल्याचं दिसून येतं. काही ठिकाणी हिंदीच्या तुलनेत गुजराती संवाद जुनैदने जास्त चांगले म्हटले आहेत. जुनैदचा हा पहिलाच सिनेमा असल्याने सुधारणेला खूप वाव आहे. शालिनी पांडेची भूमिका फार मोठी नाही, पण तिने तिच्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तर, चुलबुली विराज म्हणजेच शर्वरी वाघने तिचं पात्र अगदी उत्तम साकारलं आहे. तिची संवादफेक असो वा हावभाव, ती पडद्यावर आली की संथ चालणाऱ्या सिनेमाला जणू वेग येतो, एक चैतन्य जाणवतं. जेजेची भूमिका करणारा जयदीप अहलावत नेहमीप्रमाणे भाव खाऊन गेला आहे. चित्रपटात त्याचे संवाद खूप कमी आहे, पण देहबोली आणि मोजक्याच संवादातून तो त्याच्या पात्राचं महत्त्व सिद्ध करतो.

चित्रपटातील गाणी श्रवणीय नाहीत, प्रेक्षणीय आहेत आणि ती फारशी लक्षात राहणारी नाहीत. एकंदरीत चित्रपटाचा विषय चांगला आहे, कथा चांगली आहे पण दिग्दर्शकाने ती कथा नीट उलगडण्याऐवजी ती आटोपण्याचा प्रयत्न केल्याचं यात दिसून येतंय. चित्रपट काही ठराविक लोकेशनवरच शूट करण्यात आला आहे, त्यामुळे त्याच जागा, तीच पात्रं पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात, फक्त संवाद बदलतात. कलाकारांनी बरीच मेहनत घेतली आहे, त्यामुळे दिग्दर्शकाने आणखी मेहनत घेतली असती तर यातील रटाळपणा नक्कीच टाळता येऊ शकला असता. त्या काळच्या प्रथा, तेव्हा लोकांना येणाऱ्या अडचणी, तेव्हाची संस्कृती या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची आवड असेल, त्यांनी हा सिनेमा नक्की पाहावा.