Tridha Choudhury on breakup: बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेली ‘आश्रम’ ही वेब सीरिज चांगलीच गाजली. या सीरिजचा पहिला सीझन ऑगस्ट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, तर दुसरा सीझन नोव्हेंबर २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता; तर तिसरा सीझन जून २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या तीनही सीझनला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. बॉबी देओलला एका वेगळ्याच भूमिकेत पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळाली होती.

बॉबी देओलबरोबरच या सीरिजमध्ये अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. यामध्ये अभिनेत्री त्रिधा चौधरीचादेखील समावेश आहे. त्रिधा चौधरीला ‘दहलीज’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ‘आश्रम’ वेब सीरिजमधील तिच्या भूमिकेने लक्ष वेधून घेतले. सीरिजमधील तिच्या बोल्ड सीन्सची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मात्र, बोल्ड सीन्समुळे तिचे ब्रेकअप झाले, असा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला आहे.

त्रिधा चौधरी काय म्हणाली?

त्रिधाने अल्फाटॉक्स या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत ती म्हणाली, “सीरिजमधील बोल्ड सीन्स माझ्या बॉयफ्रेंडला मान्य नव्हते. मी असे सीन करावेत, असे त्याला वाटत नव्हते. तो दिग्दर्शकाकडे गेला आणि सीन्समध्ये बदलही केले. त्याने दिग्दर्शकाला सांगितले की या मुलीबरोबर मी लग्न करणार आहे, तिने असे सीन करू नयेत असे मला वाटते, त्यामुळे सीन्समध्ये तुम्ही बदल करा. त्यावेळी मी त्याचे म्हणणे समजून घेतले, त्याला पाठिंबा दिला. मात्र, नंतर माझ्या लक्षात आले की अभिनय करणे फक्त माझे कामच नाही तर माझी ती जबाबदारीसुद्धा आहे. शेवटी आमचे ब्रेकअप झाले.”

त्याच मुलाखतीत त्रिधा चौधरीने ‘आश्रम’ सीरिजचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचा खुलासादेखील केला आहे. यामध्ये बॉबी देओल आणि त्रिधा चौधरी दोघेही दिसणार आहेत. मात्र, ही सीरिज कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

त्रिधाने ‘अरेज्ड’, ‘कुतुब मिनार’, ‘बटरफ्लाइस’, ‘शमशेरा’, ‘व्हिट्रो मेट्स’, ‘स्पॉटलाइट’, ‘दुल्हा वॉन्टेड’, ‘किस किसको प्यार करूँ २’ अशा मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.