कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हा विषय घेऊन ॲक्युज्ड हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमातील सस्पेन्स सुरुवातीला राखला गेला, पण नंतर नंतर पटकथा विस्कळीत झाली. त्यामुळे एक चांगला विषय घेऊनही अपेक्षित प्रभाव पडला नसल्याने प्रेक्षकांची निराशा होते.
सुमारे दशकभरापूर्वी मीटू ही चळवळ जगभर गाजली. कामाच्या ठिकाणी होणार्या लैंगिक छळाला सामोरं गेलेल्या अनेक महिलांच्या अन्यायाला या चळवळीच्या निमित्तानं वाचा फुटली. सिनेमापासून राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रातील लोकांची कारकीर्द, प्रतिष्ठा पणाला लागली. या चळवळीतील पीडित बहुतांश महिलाच होत्या आणि शोषणकर्ते पद किंवा सत्ता भोगणारे पुरुष. पण याउलट परिस्थिती असली म्हणजे महिला वरिष्ठ पदी असली तरीही बळी जाणारी महिलाच असू शकते या कथासूत्रावर अक्युज्ड सिनेमा आधारित आहे.
अशी कथा रचण्यासाठी मग ही महिला समलिंगी असणं, बरं मग ती समलिंगी म्हणून कथानक भारताबाहेर घडणं हे ओघाने आलं. लंडनमध्ये एक प्रतिष्ठित, यशस्वी डॉक्टर असलेली गितिका (कोंकणा सेन शर्मा) आणि तिची जोडीदार डॉ. मीरा (प्रतिभा रांटा) यांच्याभोवती हे कथानक फिरतं. डॉ. गितिका हिची रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावर निवड होणार हे जवळपास स्पष्ट असतानाच तिच्यावर यौनशोषणाचं बालंट येतं आणि ती त्यात खोल रुतत जाते. याचे पडसाद तिच्या व्यावसायिक आयुष्यावर तर उमटतातच, पण तिच्या आणि तिच्या जोडीदाराच्या नात्यावरही याचा परिणाम होतो.
कथा, पटकथा त्यातील सस्पेन्स खूप वेळपर्यंत कायम ठेवण्यात दिग्दर्शिका अनुभूति कश्यप यशस्वी झाली. पण सिनेमाची अखेर अपेक्षाभंग करते. खरे तर अनुभूति कश्यप हिने आपल्या दिग्दर्शनाची झलक ‘डॉ. जी’ या सिनेमातून दाखवली होती. अक्युज्डचा गंभीर विषयही तिने चांगल्या पद्धतीने हाताळला पण त्याची पटकथा मात्र विषयासाठी कमी पडली. संपूर्ण सिनेमा कोंकणा सेन शर्माने तिच्या नेहमीच्या दमदार अभियानाच्या जोरावर उचलून धरला आहे. ह्य्लापता लेडीजह्ण फेम प्रतिभा रांटा हिच्या अभिनयाची चुणूक याही सिनेमात दिसली. कोंकणासमोर तिनं तितकाच तोलामोलाचा अभिनय सादर केला.
एक अत्यंत गंभीर आणि नाजूक विषय मांडताना त्याचा तोल जराही ढासळला तर संपूर्ण विषयाचा सुरुवातीला कितीही चांगल्या पद्धतीनं रचलेला इमलाही कोसळतो. या सिनेमाचं काहीसं असंच झालं आहे.
ॲक्युज्ड
दिग्दर्शक – अनुभूती कश्यप
ओटीटी – नेटफ्लिक्स
