Siddharth Jadhav Post For Nagraj Manjule : ‘सैराट’, ‘फॅन्ड्री’, ‘झुंड’ यांसारख्या दर्जेदार कलाकृतींमधून वास्तववादी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे नागराज मंजुळे लवकरच ओटीटीवर पदार्पण करत आहेत. नागराज मंजुळे प्रेक्षकांसाठी ‘मटका किंग’ नावाची सीरिज घेऊन येत आहेत.

नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’ या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या ‘मटका किंग’मध्ये अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकरदेखील झळकली आहे. तसेच अभिनेता सिद्धार्थ जाधवही या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सीरिजमधून सिद्धार्थसुद्धा ओटीटीवर पदार्पण करत आहे. याचनिमित्ताने त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सिद्धार्थ सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो शेअर करत असतो. तसेच आपल्या कामाची माहितीसुद्धा शेअर करताना दिसतो. अशातच त्याने ‘मटका किंग’ सीरिजसाठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नागराज मंजुळेंचे आभार मानले आहेत. सेटवरील काही खास क्षण अभिनेत्याने शेअर केले आहेत.

सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी पोस्ट

“नागराज मंजुळे भावा… तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छा प्रत्येक नटाची असते. ‘मटका किंग’च्या निमित्ताने माझी ती इच्छा पूर्ण झाली… माझ्या आयुष्यातली पहिली वेबसीरिज ती ही तुझ्या दिग्दर्शनाखाली… ‘दगडू विचारे’ नावाचं पात्र तू मला साकारायला दिलंस. माझ्यावर विश्वास ठेवलास… त्यात ॲमेझॉन प्राईमसारखा प्लॅटफॉर्म सिद्धार्थ रॉय कपूर, अश्विनी मॅम, यांच्यासारखे निर्माते आणि विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोव्हर, भरत जाधव सर, भूपेंद्र जडावत, गिरीश कुलकर्णी सर, किशोर कदम सर आणि अशा मात्तबर कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. नटाला प्रत्येक वेळेला चांगलं काम करायची संधी हवी असते आणि कुणीतरी तो विश्वास टाकावा अशी त्याची इच्छा असते. म्हणून तूच लिहिलेला डायलॉग तुलाच सारखा सारखा ऐकवतो… “शुक्रिया शेठ…. काम देने के लिए नही… भरोसा रखने के लिये” – आपला सिद्धू…”

सिद्धार्थ जाधवने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट

सिद्धार्थने शेअर केलेल्या या भावुक पोस्टवर अनेक कलाकारांनीसुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रेश्मा शिंदे, किरण गायकवाड, आदिनाथ कोठारे, सलील कुलकर्णी, मेघना एरंडेसह अनेकांनी या पोस्टखालील कमेंट्सद्वारे सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, ‘मटका किंग’ या सीरिजबद्दल सांगायचे झाल्यास, अंडरवर्ल्ड आणि मटका व्यवसायाची पार्श्वभूमी असलेली ही बहुचर्चित सीरिज १७ एप्रिल रोजी प्राइम व्हिडीओवर भारत आणि जगभरातील २४० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज एका अशा जगात घेऊन जाते, जिथे ‘मटका’ हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे.