Adakitta Zee5 Web Series Release Date Announced : घर, संसार, बाळाची जबाबदारी या सगळ्या गोष्टी सांभाळून ऑफिसच्या कामात लक्ष देणं फारच कठीण आहे. गौतम आणि कस्तुरी हे आनंदी आणि स्वतंत्र विचारांचं जोडपं. दोघांनी स्वत:च्या करिअरवर लक्ष केंद्रीत करून मोठं यश मिळवलेलं आहे. मात्र, बाळाचा निर्णय घेतल्यावर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलतं. बाळाच्या जन्मानंतर एकीकडे पालकत्वाची जबाबदारी आणि दुसरीकडे व्यावसायिक आयुष्य यांचा मेळ घालणं या जोडप्याला कठीण होऊन बसतं. यानंतर त्यांच्या घरी येते मंगल नावाची नॅनी.

सुरुवातीला नव्याने आलेल्या पालकत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी त्यांना मंगलचा मोठा आधार मिळतो. मात्र, कस्तुरी आणि गौतम तिच्यावर अधिकाधिक अवलंबून राहू लागतात, तशी त्यांच्या घरातील परिस्थितीही बदलू लागते. हळूहळू त्यांच्या निर्णयांवर, दैनंदिन सवयींवर आणि घरातील कामांवर मंगलचा प्रभाव वाढू लागतो. अखेर तिची उपस्थिती मदत म्हणून कमी आणि नियंत्रण म्हणून अधिक जाणवू लागते. आता यानंतर गौतम, कस्तुरी आणि मंगल या तिघांचं आयुष्य कोणतं नवीन वळण घेणार याचा प्रवास प्रेक्षकांना ‘अडकित्ता’ या सीरिजमध्ये पाहायला मिळेल.

‘अडकित्ता’चा प्रीमियर Zee5 वर ११ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन आशुतोष परांडकर यांनी केलं असून, यामध्ये सई ताम्हणकर ( मंगल ), सखी गोखले ( कस्तुरी ) आणि सिद्धार्थ चांदेकर ( गौतम ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मदतीची गरज असलेल्या एका तरुण जोडप्याची साधी वाटणारी ही कथा पुढे विश्वास, परावलंबित्व आणि घरातील नात्यांच्या मर्यादा यांचा वेध घेणारी उत्कंठावर्धक कथा होते. यामध्ये व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधताना दररोज करावी लागणारी कसरत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. गोंधळ आणि धावपळीच्या प्रसंगांतही विनोद आणि नात्यांमधील जिव्हाळा शोधणारी ही एक हृदयस्पर्शी कथा आहे.

चित्रपटाविषयी बोलताना मंगलची भूमिका साकारणारी सई ताम्हणकर सांगते, “गौतम आणि कस्तुरीच्या आयुष्यात अगदी अनपेक्षितवेळी मंगलचा प्रवेश होतो आणि हळूहळू ती त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होते. वरवर दिसते त्यापेक्षा मंगलच्या व्यक्तिमत्त्वात बरंच काही दडलेलं आहे आणि तिच्या भूमिकेतील हीच गोष्ट मला विशेष रंजक वाटली. वेगवेगळे विचार आणि स्वभाव असलेली माणसं प्रेमाच्या एका समान धाग्यामुळे अखेर एकाच भूमिकेवर कशी येऊ शकतात, हे ‘अडकित्ता’मध्ये अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.”

गौतमची भूमिका साकारणारा सिद्धार्थ चांदेकर सांगतो, “पालकत्वामुळे गौतमच्या आयुष्याचं गणित बदलतं. एकीकडे त्याला आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे, तर दुसरीकडे स्वतःचं करिअरही घडवायचं आहे. ‘अडकित्ता’मध्ये या परिस्थिती विनोद आणि जिव्हाळ्याने मांडण्यात आल्या आहेत, पण त्यामागे एक भावनिक प्रवासही आहे. आपण आयुष्यात घेत असलेले निर्णय, निभावत असलेल्या भूमिका आणि या दोन्हींत समतोल कसा साधायचा, याबद्दल गौतम आणि कस्तुरीचा प्रवास प्रेक्षकांमध्ये चर्चा घडवून आणेल, अशी मला आशा आहे.”

तसेच, कस्तुरीची भूमिका साकारणारी सखी गोखले म्हणाली, “कस्तुरी ही शहरात राहणारी स्वतंत्र विचारांची स्त्री आहे. विभक्त कुटुंबात नव्याने आलेलं मातृत्व सांभाळताना ती आपल्या महत्त्वाकांक्षाही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा संघर्ष अनेकांच्या आयुष्यात दिसतो, मात्र त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. त्यामुळे ‘अडकित्ता’ची कथा आणि कस्तुरीची व्यक्तिरेखा अनेकांना आपल्या आयुष्याशी मिळतीजुळती वाटेल.”