Detective Dhananjay ZEE5 : गेल्या काही वर्षात मराठी ओटीटी माध्यमांवर नवनवीन प्रयोग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडेच ZEE5 वर आदिनाथ कोठारेची मुख्य भूमिका असलेली ‘डिटेक्टिव्ह धनंजय’ ही नवीकोरी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. करिअरमध्ये पहिल्यांदाच त्याने डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी आदिनाथने कशी तयारी केली होती जाणून घेऊयात…

डिटेक्टिव्हच्या भूमिकेसाठी तयारी करताना खऱ्या आयुष्यातील ‘डिटेक्टिव्ह सवयी’ आत्मसात केल्या का? उदाहरणार्थ लोकांचं निरीक्षण करणं वगैरे? यावर आदिनाथ म्हणाला, “नक्कीच. मी खूप डिटेक्टिव्ह कंटेंट पाहत होतो आणि याशिवाय पुस्तकं देखील वाचत होतो. शेरलॉक होम्ससारख्या कथा पुन्हा वाचल्या. पण या व्यक्तिरेखेसाठी मी एक खास गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, ती म्हणजे… डिटेक्टिव्ह धनंजय हा असा माणूस आहे जो सहजपणे गर्दीत मिसळतो आणि कुणाच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे हे पात्र अगदी नॉन-ग्लॅमरस, नॉन-हिरोइक दिसायला हवं याची मला कल्पना होती. एक सामान्य माणूस, ज्याचा चेहराही कदाचित तुम्हाला लक्षात राहणार नाही. त्यामुळे त्या प्रकारच्या बॉडी लँग्वेजसाठी मी मेहनत घेतली. इथे मला खूप साधा आणि अगदी लक्षात न येणारा माणूस साकारायचा होता, जे एक मोठं आव्हान होतं. आम्ही त्याचा लूक, मेकअप आणि बॉडी लँग्वेज यावर काम केलं. मी शक्य तितका साधा, नॉन-मॅस्क्युलिन आणि शांत व्यक्तिमत्त्वाचा माणूस साकारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तो सहज गर्दीत मिसळेल.”

“शूटदरम्यान कधी असा क्षण आला का, जेव्हा तुम्हाला पुढे कथेत काय होणार आहे याचा अंदाज येत नव्हता?” आदिनाथ याविषयी सांगतो, “तसं होणं शक्य नव्हतं, कारण मी या प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंट प्रोसेसचाच भाग होतो. मी या प्रोजेक्टसाठी सुरुवातीपासून निर्माता म्हणून काम करत होतो. त्यामुळे कथा आणि व्यक्तिरेखा दोन्हीचा अनुभव खूप Immersive होता. कथेच्या सुरुवातीपासून…स्टोरी क्रॅक करणं, व्यक्तिरेखा आणि पटकथा विकसित करणं…हा सगळा प्रवास मलाही खूप जवळून अनुभवायला मिळाला. कधी कधी फक्त अभिनेता म्हणून काम करताना व्यक्तिरेखेत शिरायला वेळ लागतो, पण इथे टीमसोबत काम करताना तुम्ही लवकर त्या जगात आणि त्या व्यक्तिरेखेत रमून जाता. त्यामुळे हा एक मोठा फायदा होता.”

“निर्माता म्हणून असा एखादा निर्णय होता का, ज्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागली नाही, पण शेवटी तो निर्णय योग्य ठरला?”

“हो, अशा अनेक गोष्टी होत्या. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ‘डिटेक्टिव्ह धनंजय’ ही भूमिका स्वतः साकारायची होती. मी यापूर्वी नेहमीच ठळक, हिरोइक भूमिका साकारल्या होत्या, आणि हा धनंजय अगदी साधा आणि गर्दीत मिसळणारा होता. मी आधी असं काही केलं नव्हतं, त्यामुळे थोडी भीती आणि शंका होती, आणि त्याचाच विचार करत मी रात्री जागा राहायचो. दिग्दर्शकाबरोर मी सतत विचार करत होतो की, मी हे कॅरेक्टर कसं साकारू शकतो. आम्ही काही ट्रायल्स आणि लूक टेस्ट्स केल्या, आणि शेवटी मेकअप, बॉडी लँग्वेज असा साधेपणातून हा लूक तयार झाला. लूक टेस्टनंतर आम्ही सर्वांना पटवून दिलं की, मी डिटेक्टिव्ह धनंजयची भूमिका साकरू शकतो. त्यामुळे ते एक मोठं आव्हान होतं, पण शेवटी तो निर्णय योग्य ठरला.” असं आदिनाथ कोठारेने सांगितलं.