Aga Aai Aaho Aai Series : ‘अगं आई अहो आई’ ही Zee 5 ची नवीन सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, नुकताच याचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. वरुण नार्वेकर दिग्दर्शित आणि कल्याणी पंडित लिखित या सीरिजमध्ये प्रेक्षकांना एका मुलीचा अन् तिच्या आई तसेच सासूबाईंचा अनोखा प्रवास पाहायला मिळणार आहे. कुटुंब एकत्र आलं की प्रेम अधिक फुलतं, हे या कथेतून अधोरेखित होतं. ही सीरिज २४ जुलै २०२६ पासून मराठी Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे.

‘अगं आई अहो आई’ ही कथा एका नवविवाहित तरुणीची आहे, जी नव्या कुटुंबात स्वतःचं स्थान शोधत असते. ही वेब मालिका नायिकेच्या भावनिक प्रवासाची झलक दाखवते. पुण्यातील तिचं परिचित आयुष्य मागे सोडून ती कोल्हापूरमध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करते. नव्या परंपरा, अपेक्षा आणि वातावरणाशी जुळवून घेत असताना ती आपल्या नव्या कुटुंबाशी अर्थपूर्ण नाती निर्माण करते. या कथेच्या केंद्रस्थानी सून आणि सासू यांच्यात हळुहळू विकसित होणारं नातं आहे.

दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणाले “वर्षानुवर्षे लोकप्रिय कथांमध्ये सासू-सुनेचं नातं प्रामुख्याने संघर्षाच्या नजरेतून दाखवलं गेलं आहे. पण, ‘अगं आई अहो आई’मध्ये हे नातं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल.” तर, हृताच्या आईची भूमिका साकारणाऱ्या रेणुका शहाणे म्हणाल्या, “एक आई म्हणून आपल्या मुलीला तिच्या नव्या आयुष्यात प्रेम, समजूतदारपणा आणि आधार मिळावा, अशी प्रत्येक आईची इच्छा असते. ही कथा अतिशय सुंदर पद्धतीने दाखवते की, लग्नानंतर मुलगी एक कुटुंब गमावत नाही, तर आणखी एक कुटुंब जोडते.”

निर्मिती सावंत म्हणाल्या, “ही कथा अनेक वर्षांपासूनच्या साचेबद्ध कथनपद्धतीला छेद देते. सासू-सुनेमधील संघर्ष, वर्चस्व किंवा अहंकार याऐवजी तुम्हाला एक जिव्हाळ्याचं नातं पाहायला मिळेल. लग्न म्हणजे मुलीने एक कुटुंब गमावणं नव्हे, तर तिला आणखी एक आई मिळणं, हा विचार अतिशय सुंदरपणे मांडला आहे. परस्पर समजूतदारपणा, आदर आणि प्रेम यावर उभ्या असलेल्या या नात्यांमुळे ही कथा ताजी आणि मनाला स्पर्श करणारी वाटते. या प्रवासातला आशावाद आणि ऊब प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल.”

दरम्यान, ही सीरिज येत्या २४ जुलैला मराठी Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनी या सीरिजच्या ट्रेलरवरच कौतुकाचा वर्षाव केला आहे.