तेज प्रताप यादव सध्या ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवरील ‘राइज अँड फॉल २’ या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. या शोमध्ये सध्या जोरदार ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच एका भागात तेज प्रताप यांनी आपल्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला. लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांनंतरच पत्नी ऐश्वर्या रायबरोबर भांडणं सुरू झाली होती. तसेच एकदा आपण तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबर चॅट करताना पकडलं होतं, असा दावाही त्यांनी केला.
‘राइज अँड फॉल २’ मध्ये निहारिका तिवारीने तेज प्रताप यांना त्यांच्या घटस्फोटाबद्दल विचारलं. त्यावर त्यांनी आपल्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांच्या काही गोष्टी सांगितल्या. “भांडण झालं होतं. नवीनच लग्न झालं होतं आणि अवघ्या ३ महिन्यांतच भांडणं सुरू झाली. तिचे आणि माझे विचार वेगळे होते. मी दबावाखाली लग्न केलं होतं. त्यावेळी मी बिहारचा आरोग्यमंत्री होतो. लग्नाच्या काही महिन्यांनी आमच्यात खटके उडू लागले. आमचे विचार वेगळे असल्याने आमच्यात नेहमी भांडणं व्हायची,” असं तेज प्रताप म्हणाले.
घरी जावंसं वाटायचं नाही – तेज प्रताप
पुढे ते म्हणाले, “मला घरी जावंसं वाटायचं नाही. कधी मित्राच्या घरी राहायचो, तर कधी दुसऱ्या कुठे निघून जायचो.” तेज प्रताप यांनी दावा केला की, त्यांच्या आई-वडिलांसमोरही त्यांच्यात आणि ऐश्वर्यामध्ये भांडणं व्हायची. ते सकाळी लवकर उठून पूजा करायचे, पण ऐश्वर्याला हे आवडत नव्हतं आणि तिने त्यांना पूजा करण्यास मनाईही केली होती.

पार्ट्या करायची ऐश्वर्या राय, तेज प्रताप यांचे आरोप
तेज प्रताप यांनी ऐश्वर्याच्या लाईफस्टाईलबद्दलही अनेक दावे केले. ऐश्वर्या रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करायची आणि अनेकदा या पार्ट्या पहाटे ४-५ वाजेपर्यंत चालायच्या, असं त्यांनी सांगितलं. ऐश्वर्या रायबरोबर अरेंज मॅरेज होतं, असं तेज प्रताप यांनी स्पष्ट केलं. तसेच आपल्यातील भांडणांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ते न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले, असंही त्यांनी सांगितलं.
ऐश्वर्या रायला एक्स बॉयफ्रेंडशी चॅट करताना पाहिलं – तेज प्रताप
ते म्हणाले, “त्यादिवशी मी विधानसभेत गेलो होतो. संध्याकाळी घरी आलो आणि बेडरूममध्ये जात होतो, तेव्हा ती एका मुलाशी चॅट करत होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तिचा एक एक्स बॉयफ्रेंड होता, त्याच्याशी ती चॅट करत होती, ‘लव्ह यू’ लिहून हार्ट इमोजी पाठवत होती. मी दुरूनच हे सर्व पाहिलं होतं.”
दरम्यान, तेज प्रताप यादव यांनी १२ मे २०१८ रोजी ऐश्वर्या राय हिच्याशी लग्न केलं होतं. ऐश्वर्या ही बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी आहे. मात्र, लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांनंतरच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि तेज प्रताप यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
