Akanksha Chamola Bisexual : ‘लॉक अप २’ या ओटीटी शोचा दुसरा सीझन सुरू झाला असून, तो जोरदार चर्चेमध्ये आला आहे. त्यामध्ये पहिल्या दिवसापासून मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता गौरव खन्ना याची पत्नी आकांक्षा चमोला ही चर्चेमध्ये आली आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये आकांक्षा हिने तिचा आणि गौरवचा घटस्फोट होणार असल्याचे जाहीर केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. ती व गौरव खन्ना वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. त्यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा तिने केला होता. त्यानंतर आता आकांक्षाने ती बायसेक्शुअल असून, तिचे लग्नापूर्वी इतर मुलींबरोबर संबंध होते, असा खुलासा केला आहे.

नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये आकांक्षाला मैत्रीण मानलेल्या श्रेया कालरा हिने त्यांचे एक गुपित उघड केल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे तिची गेममधील एक ‘लाइफलाइन’ गेली आहे. श्रेयाने आकांक्षा ही बायसेक्शुअल असल्याचे गुपित उघड केल्यामुळे आकांक्षाने श्रेयाला जाब विचारला. तसेच तिने श्रेयाला सर्वांत दुष्ट व्यक्ती म्हटले असून, त्याचा गेममध्ये काहीही संबंध नसताना तिने या माहितीचा गैरवापर केल्याबद्दल आकांक्षाने नाराजी व्यक्त केली. त्यासह आकांक्षा चमोला हिचे लग्नापूर्वी काही मुलींशी संबंध असल्याचा खुलासा तिने केला आहे.

काही मुलींसह खास नाते होते – आकांक्षा

आकांक्षा चमोला हिने तिच्या लैंगिकतेविषयी स्पष्टपणे भाष्य केले आहे. ती म्हणाली, “हो, लग्नापूर्वी मी बायसेक्शुअल होते. माझे काही मुलींबरोबर रिलेशनशिप होते. ते रिलेशन फार शारीरिक स्वरूपाचे नव्हते; पण काही मुलींसह खास नात्यामध्ये होते,” असा खुलासा तिने स्वतः केला आहे. पुढे ती म्हणाली, “मला महिलांबद्दल आकर्षण वाटतं. त्यांच्याबद्दल आदर वाटतो आणि त्यांच्यात मला एक सुरक्षितता जाणवते. आपण मोठं होताना पुरुषांचा प्रभाव असलेल्या समाजामध्ये असतो, त्यामुळे आई, बहीण किंवा इतर महिलांकडून मिळणारा भावनिक आधार आणि आपुलकी माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाची राहिली आहे.”

पुढे आकांक्षा म्हणाली, “मला महिलांमध्ये असणारी ऊर्जा, आपुलकी आणि जिव्हाळा खूप आवडतो. समाजात नेहमीच दोन मुली चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, त्यांच्यात मत्सर किंवा स्पर्धा असते, असे म्हटले जाते. मात्र, माझ्या बाबतीत असे कधीच नव्हते. माझ्यासाठी प्रत्येक स्त्री सुंदर आहे. समाजानं त्याला काहीही नाव दिलं असलं तरी माझ्यासाठी ते निखळ प्रेम आणि आपुलकी आहे.”

    गौरव खन्ना व आकांक्षा चमोला यांचे नाते

    गौरव खन्ना व आकांक्षा चमोला यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली असून, मागील एक वर्षापासून ते वेगवेगळे राहत आहेत. गौरव व आकांक्षाच्या वयात तब्बल नऊ वर्षांचं अंतर आहे. गौरव ४४ वर्षांचा असून, आकांक्षा ३५ वर्षांची आहे. ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे आकांक्षाने जाहीर केले आहे. ती म्हणाली की, एक वर्षापासून जरी आम्ही वेगळे राहत असलो, तरी आमच्यात भांडणं नाहीत. आम्ही आपापसांत चर्चा करून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आमच्यात कटुता आली नसली तरी आता मात्र आमच्यामध्ये पती-पत्नीसारखं काही राहिलेलं नाही.”