गेल्या काही दिवसांपासून लॉक अप सीझन २ चर्चेत आहे. कार्यक्रमात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी सहभाग घेतला असून यामध्ये अनेक जण त्यांच्या खासगी आयुष्यातील खडतर, वाईट प्रसंग सांगताना दिसत आहेत. ज्यामुळे दररोज अनेकांच्या चर्चेचा विषय बनत आहे. यापैकीच एक म्हणजे बिग बॉस सीझन १९चा विजेता गौरव खन्नाची बायको अभिनेत्री आकांक्षा चमोला.

आकांक्षानेही या कार्यक्रमात तिच्या व गौरवच्या नात्याबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे आणि तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत. ज्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकासुद्धा केली. अशातच आता तिने पुन्हा तिचं तिसरं रहस्य लोकांना कळलं तर लोक तिला व गौरवला सार्वजनिक ठिकाणी मारतील असं वक्तव्य केलं आहे. ती नेमकं काय म्हणाली याबद्दल जाणून घेऊयात…

‘लॉक अप २’मध्ये प्रवेश केल्यापासून आकांक्षा चमोला हिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. शोच्या पहिल्याच भागात तिने तिचा नवरा आणि अभिनेता गौरव खन्नापासून ती गेल्या वर्षभरापासून वेगळी राहत असल्याचं आणि दोघांचा घटस्फोट होण्याच्या मार्गावर असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर शोमध्ये आकांक्षाच्या भूतकाळाशी संबंधित आणखी एका गुपिताची चर्चा झाली. ‘जजमेंट डे’ एपिसोडमध्ये तिने लग्नापूर्वी आपण बायसेक्श्युअल असल्याचं आणि तिला मुली आवडतात याचा खुलासा केला होता.

आता मात्र आकांक्षाने सांगितलं आहे की, तिच्या आयुष्यातील तिसरं गुपित जर ‘लॉक अप २’मध्ये उघड झालं, तर त्याचे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर यापेक्षाही गंभीर परिणाम होऊ शकतात. झालं असं की एका टास्कदरम्यान स्पर्धक श्रेया कालरा हिच्या हातात आकांक्षा चमोलाचं गुपित असलेली चावी लागली. त्यानंतर आकांक्षाने वारंवार श्रेयाला ते गुपित उघड न करण्याची विनंती केली. “माझा विश्वासघात करू नकोस,” अशी विनवणीही तिने केली. यानंतर स्पर्धक पामेला सेरेना हिच्याशी बोलताना आकांक्षाने तिला हे गुपित उघड होण्याची भीती का वाटते, यामागचं कारण स्पष्ट केलं.

आकांक्षा काय म्हणाली?

ती म्हणाली, “धोक्यात मी आहे. श्रेयाला कदाचित समजत नाही की मी एक पब्लिक फिगर आहे आणि माझा नवरा गौरव खन्नाचं इंडस्ट्रीत मोठं नाव आहे. हे गुपित बाहेर आलं तर लोक आमच्यावर तुटून पडतील, आम्हाला सोडणार नाही. काही दिवसांनी लोक श्रेयाला विसरतील, पण गौरव आणि मला कायम लक्षात ठेवतील. आता मला माझ्या संपूर्ण कुटुंबालाही उत्तर द्यावं लागेल.”