आपल्याकडे पितृसत्ताक पद्धतीच्या आधी मातृसत्ताक पद्धती होती असं म्हटलं जातं. त्याची आठवण येण्याचं कारण अक्का नावाची वेब सीरिज. या वेबसीरिजमध्ये राधिका आपटे, किर्ती सुरेश, तन्वी आजमी, मोनिका तंवर, विशाक नायर, पूर्णिमा इंद्रजीत, अंजली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर महेश मांजरेकर पाहुणा कलाकार म्हणून आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. जाणून घेऊ या सीरिजमध्ये काय जमलंय काय नाही.

अक्का वेबसीरिजची कथा थोडक्यात

या वेबसीरिजची कहाणी ८०० वर्षांचा जुना इतिहास सांगते. त्यानंतर १९५० ते १९८० चं दशक यात घडले. पेरनरू या ठिकाणी दक्षिण भारतातल्या काल्पनिक ठिकाणी महिलांचं राज्य आहे म्हणजे या ठिकाणी मातृसत्ताक पद्धती आहे. त्यामुळे गादीवर बसणाऱ्या सर्वोच्च महिलेला अक्का असं म्हटलं जातं. या शहरातला सर्वात मोठा नियम म्हणजे या घराण्यातल्या महिला लग्न करू शकत नाहीत. त्या प्रियकराला ठेवू शकतात, पण लग्न, संसार या पाशांमध्ये अडकून पडत नाहीत. मुलींना या ठिकाणी कुलदेवतेप्रमाणे पूजलं जातं. मातृसत्ताक पद्धती असल्याने सगळे उत्तराधिकार हे मुलींनाच मिळतात. अशातच या एंट्री होते ती मुंबईतल्या रूद्राची म्हणजेच राधिका आपटेची. रूद्रा पेरनुरूला पोहचल्यानंतर काय काय घडतं? ती कोण असते? तिथे ती या अक्कांच्या राज्याला कसं आव्हान देते यावर ही अक्का नावाची सीरिज आधारलेली आहे. ती भवानीला म्हणजेच किर्ती सुरेशला थेट आव्हान देते. पाच भागांमध्ये ही सीरिज साकारण्यात आली आहे. पहिला भाग ४५ मिनिटांचा आहे. बाकीचे चार भाग हे साधारण ३० ते ३५ मिनिटांचे आहेत. तसंच या सीरिजमधले संवाद ही या सीरिजची एक जमेची बाजू म्हणता येईल.

पहिले दोन एपिसोड उत्तम भट्टी जमली आहे

कथेची आणि कथानकाची भट्टी पहिल्या दोन भागांमध्ये उत्तम जमून आली आहे. राधिका आपटे येते आणि महिला विरूद्ध महिला असा सामना रंगतो. पण पुढचे तीन भाग हे अपेक्षित होत जातात. त्यामुळे भट्टी जमून आलीये असं वाटत असतानाच जादू फिकी व्हायला लागते. साबुदाण्याची चवदार खिचडी खात असताना गारेचा खडा लागल्याची भावना निर्माण होते. राधिका आपटे आणि किर्ती सुरेश यांनी अभिनयाच्या बाबतीत मैदान मारलं आहे. राधिका आपटेचे तंग गाऊन आणि ड्रेसेसमधले लूक्स हे थेट १९८० मधल्या व्हॅम्प भूमिका साकारणाऱ्या महिला अभिनेत्रींची आठवण करून देते. अंशुमन पुष्कर अमर आणि नंदा विशाक नायर यांनीही त्यांना दिलेली काम चोख बजावली आहेत. पण संपूर्ण सीरिजला हिरो नाही, तसंच सीरिज हीच हिरो आहे पण त्यात अनेक दुवे निखळून पडलेत हे जाणवतं. त्यामुळे पुढची लढाई ही बऱ्यापैकी अपेक्षित होत जाते. प्रेक्षक म्हणून आपल्याला धक्का देत नाही. कथानकात कच्चे दुवे आहेत जे सहज ओळखता येतात. त्यामुळेच ही सीरिज अपेक्षित होत जाते.

हिंसा आणि रक्तपात

संपूर्ण सीरिजमध्ये हिंसा आणि रक्तपात दाखवलं जाणं हे काही खटकत नाही कारण ती कथानकाची गरज आहे. जर एखाद्या पुरुष केंद्रीत वेबसीरिज किंवा सिनेमांत आपण रक्तपात पाहू शकतो तर मग महिला केंद्रीत वेबसीरिज त्याला अपवाद कसा असेल? यातला एक सीन मात्र अंगावर येणार आहे. तिथून सीरिजला वेगळं वळण लागेल असं वाटत असतं ते लागतंही फक्त ते अपेक्षित होत जातं. शिवाय महिलांच्या सत्तेवर जळणारे पुरुषही या वेबसीरिजमध्ये आहेत. किरण करमरकर यांनी साकारलेले प्रसंगही उठावदार झाले आहेत. वेब सीरिजचा दुसरा सिझन येऊ शकतो. पण पहिला लोकांना खूप जास्त आवडेल असं नाही. मातृसत्ताक पद्धती आणि राधिका आपटे, किर्ती सुरेश यांनी सीरिज दोघींच्या खांद्यावर तारुन नेण्याचा प्रयत्न केला आहे. महेश मांजरेकरांची भूमिका छोटीशी असली तरीही लक्षात राहण्याजोगी झाली आहे.

राधिका आपटे आणि किर्ती सुरेश दोघीही भाव खाऊन गेल्या आहेत

अभिनयाच्या बाबतीत राधिका आपटे आणि किर्ती सुरेश या दोघींची जुगलबंदी पाहण्यासारखी झाली आहे. रूद्रा आणि भवानी या दोन भूमिकांमध्ये दोघीही आहेत. बुद्धीबळाप्रमाणे एकमेकींना मात देणं असो किंवा क्लायमॅक्स सीनमध्ये दोघी एकमेकींच्यासमोर आल्यानंतर जे घडतं ते पण पाहण्यासारखं झालं आहे. कायम आक्रमक असलेल्या स्त्रिया आणि बायकांच्या तालांवर नाचणारे पुरुष हे सगळंच हे या सीरिजमध्ये आहे. पण चमचमीत पदार्थाची मजा नंतर नंतर फिकी होत जाते. त्यामुळे क्लायमॅक्सला काय होणार हे आपल्याला कळतं ते तसंच घडतंही. त्यामुळे सीरिज कशी आहे हे विचारलं तर एकच उत्तर येतं वन टाइम वॉच.