Akshay Kumar Bhoot Bangla Trending on Netflix : बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आणि दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आयकॉनिक जोडी तब्बल १६ वर्षांनंतर ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आली आणि या जोडीने बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला. अवघ्या १२० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात २४७.२८ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडत २०२६ मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊन ४९ दिवस म्हणजेच ७ आठवडे पूर्ण झाल्यानंतरही हा चित्रपट ओटीटी टॉप १० च्या यादीत ९ व्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. परेश रावल, राजपाल यादव आणि वामिका गब्बी यांच्या भन्नाट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होतात. नुकताच सनी देओलचा ‘इक्का’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून, तो गेल्या तीन आठवड्यांपासून नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. त्याचबरोबर ‘पेड्डी’ आणि ‘पती पत्नी और वो २’ हे चित्रपटही टॉप १० च्या यादीत आहेत.

‘भूत बंगला’ सलग ७ आठवड्यांपासून टॉप १० मध्ये

‘भूत बंगला’ हा चित्रपट ७ आठवड्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. रिलीज होऊन ४९ दिवस उलटल्यानंतरही या चित्रपटाला ओटीटीवर तुफान प्रतिसाद मिळत असून, तो सध्या टॉप १० च्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. सध्याच्या नेटफ्लिक्स टॉप १० यादीत इक्का, कॉन सिटी, पती पत्नी और वो २, डिझायर, ब्लास्ट, दादी की शादी, पेड्डी, ७२ आवर्स, भूत बंगला आणि स्नायपर नो नेशन या चित्रपटांचा समावेश आहे.

बॉक्स ऑफिसवरही ‘भूत बंगला’ची दमदार कमाई

‘भूत बंगला’ने चित्रपटगृहांमध्येही मोठी कमाई केली होती. अवघ्या १२० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात २४७.२८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यामुळे हा चित्रपट २०२६ मधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला आणि अक्षय कुमारच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्या भन्नाट कॉमेडीने प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट केले होते.

अक्षय कुमार बऱ्याच काळानंतर दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबरोबर मोठ्या पडद्यावर परतला होता. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांनी यापूर्वी २०१० मध्ये ‘खट्टा-मीठा’ या चित्रपटात शेवटी एकत्र काम केले होते. या जोडीने आधी ‘हेरा फेरी’, ‘दे दना दन’, ‘गरम मसाला’, ‘हे बेबी’ आणि ‘भूल भुलैया’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या आणि चित्रपटाने त्या पूर्णही केल्या. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्यासोबत वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसून आली होती.