Akshaya Naik on Emraan Hashmi: ओटीटीवर सतत कोणत्या ना कोणत्या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सध्या एका वेब सीरिजची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ही वेब सीरिज म्हणजे ‘तस्करी : द स्मगलर्स वेब’ ही आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

या वेब सीरिजमध्ये इमरान हाश्मी, अमृता खानविलकर, नंदीश संधू हे प्रमुख भूमिकांत आहेत. अभिनेत्री अक्षया नाईकदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. तिने या वेब सीरिजमध्ये स्वाती साळुंखे ही भूमिका साकारली आहे.

“त्यांची सर्वांत चांगली गोष्ट ही आहे की…”

आता अक्षयाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान हाश्मीबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अभिनेत्रीने नुकतीच रेड एफएमला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मी हे प्रोजेक्ट करण्यासाठी मी खूप उत्सुक होते. जेव्हा ते पहिल्यांदा सेटवर आले तेव्हा त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. म्हणजे त्यांचा ऑरा, ते सेटवर आहेत, हे जाणवलं.”

पुढे ती म्हणाली, “त्यांची सर्वांत चांगली गोष्ट ही आहे की, त्यांना सांगावं लागत नाही की, मी आलो आहे, माझी छत्री कुठे आहे, माझं पाणी कुठे आहे. ते अशा कलाकारांपैकीसुद्धा नाहीत की, बघा माझ्याकडे मी किती नम्र आहे. माझ्याकडे त्यांच्यासाठी नो नॉनसेन्स हा एकच शब्द आहे. ते आले. त्यांनी त्यांचे डायलॉग्ज वाचले. ते स्वत:च म्हणाले की, आपण सराव करूयात का? त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींचासुद्धा सराव केला.”

अक्षया असेही म्हणाली, “बऱ्याच कलाकारांचं असं असतं की, आम्ही सीनियर कलाकार आहोत, शेवटची रिअॅक्शनसुद्धा त्यांचीच यायला हवी. सीनवर माझ्यावरच सुरू होऊन, माझ्यावरच संपला पाहिजे. मी त्यांना विचारलं की, शेवटची रिअॅक्शन मी घेऊ का, त्यावर त्यांनी होकार दिला होता. तर छोट्या छोट्या गोष्टींचा खूप फरक पडतो. चांगलं माणूस असणं हे फक्त चांगला कलाकार असण्यापेक्षा खूप महत्वाचं आहे”, असे म्हणत अक्षयाने इमरान हाश्मीचे कौतुक केले.

त्याच वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसलेल्या अमृता खानविलकरनेदेखील इमरान हाश्मीचे कौतुक केले होते. ‘नवशक्ति’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, ते खूप उत्तम आहेत. मी आणि नंदीश तुलनेने त्यांच्यापेक्षा ज्युनियर कलाकार आहोत. त्यामुळे त्यांच्याशी काय बोलू हा प्रश्न पडला असता. ते जर बोलके नसते, मैत्रीपूर्ण नसते, तितकी सहजता नसती तर… आमच्यात जी सहजता निर्माण झाली, त्याचे श्रेय त्यांना जाते.”

“इमरान हाश्मी यांच्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी मुली खूप वेड्या आहेत. मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसर मुलींचे मला फोन आले होते की, आम्हाला एकदा त्यांना भेटायचं आहे. इतकं इमरान हाश्मी यांचं फॅनफॉलोईंग आहे. ते जेंटलमन आहेत. यशस्वी असूनही ते अजिबात विचलित होत नाहीत. त्याचं असं असतं की, सेटवर आलं की काम करायचं आणि तिथून निघायचं. भरपूर वाचन असणारा, हुशार, भाषेवरती प्रभुत्व असणारा तो माणूस आहे. मला वाटतं की, ते खूप सुंदर ऑरा घेऊन येतात सेटवर आणि त्यामुळे काम करताना सहजता निर्माण होते.”

दरम्यान, ये रिश्ता क्या कहलाता है आणि सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईकला लोकप्रियता मिळाली. आता आगामी काळात ती कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.