These Series & Movies To Release On Netflix : ओटीटी हल्ली मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम झालं आहे. ओटीटीवरील अनेक प्लॅटफॉर्मवर विविध कलाकृती प्रदर्शित होत असतात. नेटफ्लिक्स त्यापैकीच एक. या ओटीटी माध्यमावर सतत नवनवीन सीरिज व चित्रपट प्रदर्शित होत असतात. अशताच या वर्षात म्हणजेच २०२६ मध्ये कोणते चित्रपट व सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

फॅमिली बिझनेस – या सीरिजमध्ये अनिल कपूर, विजय वर्मा, नेहा धुपिया, रिया चक्रवर्ती, अपारा मेहता यांसारखे अजून काही कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकणार आहेत. अनिल कपूर यामध्ये उद्योजकाच्या भूमिकेतून झळकणार आहेत. लवकरच ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

इक्का – हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. त्यामध्ये सनी देओल व अक्षय खन्ना मुख्य भूमिकांत आहेत. दोघांनाही बॉक्स ऑफिसवर नुकतंच मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. त्यामुळे त्यांचा हा चित्रपट कसा असणार आहे. यातील त्यांच्या भूमिका कशा असतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकुळ घातल्यानंतर दोघे आता ओटीटीवरून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. सनी देओल यामध्ये वकिलाच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्सवर ही कलाकृती पाहायला मिळेल.

ढिंढोरा २ – लोकप्रिय यूट्यूबर भुवन बाम त्याच्या ‘ढिंढोरा २’ या सीरिजमधून पुन्हा येत आहे. त्यामधून त्याच्या पूर्वीच्या व्हिडीओतील गाजलेले पात्र पाहायला मिळणार आहे. ही सीरिजसुद्धा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.

हॅलो बच्चों – ही खऱ्या गोष्टीवर आधारित सीरिज आहे. ‘छावा’फेम अभिनेता विनीत कुमार सिंह यामध्ये मुख्य भूमिकेतून झळकणार आहे. द व्हायरल फीवर स्टूडिओची ही सीरिज आहे.

मुसाफिर कॅफे – विक्रांत मॅसी व वेदिका पिंटो या चित्रपटात मुख्य भूमिकेतून झळकणार आहेत. त्यामध्ये नायक सुधा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि प्रामाणिकपणे तिच्यावरच प्रेम करतो. परंतु, त्याची प्रेयसी त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर तो मुसाफिर नावाने कॅफे उघडतो.

हम हिंदुस्तानी – माध्यमाच्या वृत्तानुसार भारतातील पहिल्या लोकतांत्रिक निवडणुकीची गोष्ट यामधून दाखवली जाणार आहे. त्यामध्ये सैफ अली खान महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे.

अधुरे हम अधुरे तुम – यामध्ये अभिनेता इमरान खान मुख्य भूमिकेतून झळकणार आहे. तर, त्याच्याबरोबर बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरही यामध्ये पाहायला मिळणार आहे. दोघेही पहिल्यांदाच यामधून एकत्र काम करत आहेत.

ऑपरेशन सफेद सागर – १९९९ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. भारतीय वायुसेनेने दिलेल्या योगदानावर हा चित्रपट आधारित आहे. अभय वर्मा, प्राजक्ता कोळी, दिया मिर्झा हे कलाकार यातून पाहायला मिळणार आहेत.

तलाश – अ मदर सर्च – परिणीती चोप्रा, ताहिर राज भसीन, सोनी राजदान व अनुप सोनी यांच्या यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यामध्ये मुलगी झाल्यानंतर ति्च्या आईला तो आनंदही साजरा करता येत नाही आणि तिला तिच्याकडून दूर केले जाते.

मामला लीगल है – विचित्र प्रकरण आणि वेगळे वकील यांचा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा येत आहे. यावेळी यामधून नवीन चेहरेही पाहायला मिळणार आहेत. रवी किशन, निधी बिष्ट, नायला ग्रेवाल व कुशा कपिला यांसारखे कलाकार यामधून झळकणार आहेत.

एक्युज्ड – यामध्ये कोंकणा सेन शर्मा मेडिकल प्रोफेशनलची भूमिका साकारत आहे. तिच्याबरोबर यामध्ये ‘लापता लेडीज’फेम अभिनेत्री प्रतिभा रांटासुद्धा झळकणार आहे.

माँ बहन – ‘मिसेस देशपांडे’नंतर माधुरी एका नवीन सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये तिच्यासह तृप्ती डिमरीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्सवरच ही सीरिज पाहायला मिळणार आहे.

लस्ट स्टोरीज ३ – नेटफ्लिक्सवरील ही लोकप्रिय सीरिजपैकी एक आहे. विशाल भारद्वाज, किरण राव, शकुन बत्रा व विक्रमादित्य मोटवाने हे सगळे त्यांच्या शॉर्ट फिल्म आणत आहेत. त्यामधून राधिका आपटे, अदिती राव हैदरी, कोंकणा सेन शर्मा आणि इतर काही कलाकार पाहायला मिळणार आहेत.