ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला नवे तसेच जुने चित्रपट आणि वेब सीरिज ऑनलाइन रिलीज केले जातात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने नुकताच २०२६ मधील फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांपैकी एक नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे.

थिएटरमध्ये ज्या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता, तोच चित्रपट आता नेटफ्लिक्सवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. सध्या हा चित्रपट ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. नेमका हा कोणता चित्रपट आहे, जाणून घेऊया.

नेटफ्लिक्सवर हिट ठरला फ्लॉप चित्रपट

२०२६ हे हिंदी चित्रपटांसाठी आतापर्यंत संमिश्र राहिलं आहे. ‘धुरंधर २’ आणि ‘आवारापन २’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं. तर ‘बंटवारा १९४७’ आणि ‘भारत भाग्य विधाता’ यांसारखे चित्रपट फ्लॉप ठरले. यंदाच्या सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या चित्रपटांचा उल्लेख केला, तर त्यामध्ये अल्फा (Alpha) या चित्रपटाचाही समावेश होतो. मात्र, थिएटरमध्ये अपेक्षित यश न मिळालेला हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असलेला आलिया भट्टचा स्पाय थ्रिलर ‘अल्फा’ बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नव्हता. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ऑनलाइन रिलीज करण्यात आला आहे. ओटीटीवर प्रदर्शित होताच ‘अल्फा’चं नशीब पालटलं असून सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळालेल्या या चित्रपटाला आता ओटीटीवर मात्र चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

‘अल्फा’चं कलेक्शन आणि बजेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘अल्फा’ चित्रपटाचं बजेट १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं. मात्र, बजेट वसूल होईल एवढी कमाईसुद्धा चित्रपटाला करता आली नाही. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ‘अल्फा’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे ५८ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर जगभरातील त्याची कमाई ९८ कोटी रुपये इतकी राहिली. त्यामुळे मोठं बजेट असूनही चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही.