आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांचा ‘अल्फा’ हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. ३ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, शिव रवैल दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करू शकला नाही. आता तो प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
या चित्रपटात आलिया आणि शर्वरीच्या भूमिका व ॲक्शन सीक्वेन्स पाहून प्रेक्षकांना त्याकडून फार अपेक्षा होत्या. पण त्यांचा परफॉर्मन्स आणि कमकुवत कथानकामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. प्रमोशन व आलिया- शर्वरीची क्रेझही चित्रपटाला वाचवू शकली नाही. चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आता थिएटर रिलीजला दोन महिने होण्यापूर्वीच चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे.
कुठे रिलीज होणार अल्फा?
‘अल्फा’ या शुक्रवारी, म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी २८ ऑगस्टलाच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तुम्ही आलिया भट्ट किंवा शर्वरी वाघचे चाहते असाल आणि हा चित्रपट तुम्हाला ओटीटीवर पाहायचा असेल तर तो शुक्रवारपासून पाहता येईल.
‘अल्फा’मध्ये आलिया भट्ट देशाच्या शत्रूंना संपवणाऱ्या करणाऱ्या एका किलरच्या भूमिकेत आहे. तिच्या बहिणीची भूमिका शर्वरीने साकारली आहे. चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींचे जबरदस्त ॲक्शन सीन्स आहेत, तरीही ती कथा प्रेक्षकांना बांधून ठेवू शकली नाही. आलियाच्या एकाच प्रकारच्या अभिनयामुळे ती ट्रोल झाली. तर त्याचबरोबर काहींच्या मते सिनेमाची कथा खूपच सुमार आहे.
अल्फा चित्रपटाचे बजेट व कलेक्शन
यशराज फिल्म्सने अल्फा चित्रपटावर निर्मितीवर जवळपास १०० ते १५० कोटी रुपयांचा खर्च केला होता. मात्र, भारतामध्ये या चित्रपटाने अवघी ५८ कोटी रुपयांची कमाई केली, तर जगभरात ९९ कोटींचे कलेक्शन झाले. यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आलियाच्या करिअरलाही याचा फटका बसला आहे, कारण याआधी तिचा ‘जिगरा’ चित्रपटही फ्लॉप ठरला होता.
आता येत्या काळात आलिया संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत.
