NH10 Movie on OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या क्राईम थ्रिलर चित्रपटांची मोठी लाट आहे, पण काही चित्रपट असे असतात जे काळानुसार अधिकच लोकप्रिय होतात. असाच एक चित्रपट म्हणजे अनुष्का शर्माची मुख्य भूमिका असलेला ‘NH10’. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गुडगावमधील एका जोडप्याची महामार्गावरील एका भीषण घटनेनंतर बदललेली जिंदगी आणि त्यानंतर अनुष्का शर्माने घेतलेला भयानक बदला, असं या चित्रपटाचं थरारक कथानक आहे. नवदीप सिंह दिग्दर्शित या चित्रपटात नील भूपलम यानेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. कमी बजेट असूनही या चित्रपटाने आपल्या जबरदस्त कंटेंटच्या जोरावर प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.

‘NH10’ चित्रपटाची कथा

‘NH10’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. ही कथा मीरा आणि अर्जुन या पती-पत्नीची आहे. दोघेही गुडगावमध्ये राहतात. मीराच्या वाढदिवसानिमित्त दोघेही दिल्लीच्या बाहेर फिरायला निघतात. वाटेत एका ढाब्यावर थांबले असताना, त्यांना दिसतं की काही लोक एका तरुण-तरुणीला जबरदस्तीने पकडून घेऊन जात आहेत. अर्जुन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर त्याला समजतं की ते लोक त्यांच्यातल्याच एकाच्या बहिणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला मारण्यासाठी घेऊन जात आहेत.

अर्जुन आणि मीरा त्यांचा पाठलाग करतात, पण स्वतःच मोठ्या संकटात सापडतात. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना जंगलात आणि गावागावातून, मिळेल त्या वाटेने पळावं लागते. पुढे मीराला समजतं की गावातील लोक आणि सरपंच देखील या चुकीच्या कामात सामील आहेत. शेवटी अर्जुनचा मृत्यू होतो. त्यानंतर मीरा घाबरण्याऐवजी हिम्मत दाखवते आणि ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला, त्यांचा बदला घेते.

Award Banner

‘NH10’ चित्रपटातील कलाकार

‘NH10’ या क्राइम थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन नवदीप सिंह यांनी केलं आहे. चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा आणि नील भूपलम यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, ‘NH10’ हा कमी बजेटचा चित्रपट होता. याचे बजेट साधारण १५ कोटी रुपये होते, तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४४ कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘NH10’ कोणत्या ओटीटीवर पाहायचा?

१ तास ५५ मिनिटांचा हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही घरबसल्या पाहू शकता. त्याचबरोबर तो प्राइम व्हिडीओ या ओटीटीवरही उपलब्ध आहे. या चित्रपटाला IMDb रेटिंग ७.२ मिळाले आहे. क्राइम थ्रिलर आवडणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हीही चांगलं कथानक असलेला चित्रपट ओटीटीवर शोधत असाल, तर हा चित्रपट पाहू शकता. अनुष्का शर्माची मुख्य भूमिका असलेला चित्रपट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.