टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल सध्या ‘द 50’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये झालेल्या भांडणादरम्यान, दिव्याची मैत्रीण असं काही बोलून गेली ज्याची खूपच चर्चा झाली. दिव्या आता तिच्या पतीबरोबर राहत नाही, असं भव्याने म्हटलं होतं. तसेच तिने दिव्याला ‘गोल्ड डिगर’देखील म्हटलं होतं. या संपूर्ण प्रकरणानंतर दिव्याचा पती अपूर्व पाडगावकर याने केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिव्याचा पती अपूर्वला त्याची पत्नी दिव्या अग्रवालची आठवण आली. त्याने तिचा एक फोटो पोस्ट करून लवकर घरी येण्याचा आग्रह केला. अपूर्वाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिव्याचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, “ओय मिस व्हॅलेंटाईन, शोमधून लवकर परत ये.”

अपूर्वच्या या पोस्टनंतर दिव्याच्या टीमनेही तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिव्या आणि अपूर्व रोमँटिक पोज देत आहेत. “कायमच्या प्रेमासाठी, आमच्या आवडत्या जोडप्याला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.” या पोस्टवरून असं दिसून येतं की भव्याने शोमध्ये केलेले दावे खोटे होते. कारण अपूर्वने त्याच्या पोस्टमध्ये पत्नीची वाट पाहत असल्याचं म्हटलंय.

apurva padgaonkar post for wife
अपूर्व पाडगावकरची पोस्ट
divya agarwal post
दिव्या अग्रवालची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

भव्या सिंहने काय म्हटलं होतं?

‘द 50’ शोमध्ये इन्फ्लुएन्सर भव्याने म्हटलं होतं की दिव्याचं लग्न कठीण टप्प्यातून जातंय. ती तिचा पती अपूर्वबरोबर एका घरात राहत नाहीयेत. दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. भव्या सिंहने एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं की दिव्या अग्रवाल बाहेर मैत्री असल्याचं दाखवते, पण गेममध्ये ती कोणाशीच नातं ठेवत नाही. भव्याच्या मते, दिव्याला फक्त स्वतःचे वर्चस्व गाजवायचे असते आणि ती इतरांना कमी लेखते. भव्याच्या या वक्तव्यानंतर दिव्या व अपूर्व घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याचदरम्यान आता अपूर्वने पत्नीसाठी केलेल्या पोस्टने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

२०२४ मध्ये दिव्या अग्रवालने अपूर्व पाडगावकरशी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. पण लग्नानंतर लगेचच त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले. लोकांनी असा दावा केला की दिव्याने पैशासाठी अपूर्वशी लग्न केलं. त्यानंतर काही दिवसांनी दिव्याने सोशल मीडियावरून तिच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या, तेव्हा दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं गेलं होतं.