Archana Puran Singh family insult in Samay Raina show : कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री अर्चना पूरन सिंह सहभागी झाल्या होत्या. पॅनलमध्ये सहभागी झाल्यानंतर अर्चना यांनी खास विनोदी शैलीतून मनोरंजन केले. अर्चना यांच्यासह त्यांचे कुटुंबसुद्धा या वेळी उपस्थित होते. समयने अर्चना पूरन सिंह यांच्या कुटुंबाला बेरोजगार म्हणत त्यांच्यावर विनोद केला होता. यावरून सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा झाल्यानंतर अर्चना पूरन सिंह यांच्या मुलाने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
अर्चना पूरन सिंह यांच्याबरोबर त्यांची मुले आर्यमान व आयुष्मान सहभागी झाले होते. प्रेक्षक म्हणून पहिल्याच रांगेत बसलेल्या दोघांची समयने फिरकी घेत त्यांच्यावर विनोद केला. यांच्या घरामध्ये ‘उलटी पितृसत्ता’ पद्धत असून फक्त महिलाच कमवत असल्याचे समय म्हणाल्याने एकच हशा पिकला. पण, समयच्या या विनोदातून त्याने अर्चना यांच्या पूर्ण कुटुंबाचा अपमान केल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले. यावर आर्यमानने समयने कोणताही अपमान केला नाही तर तो फक्त एक विनोद असल्याचे मत व्यक्त केले.
समयने केलेला तो विनोद मजेशीर – आर्यमान
त्यांच्या कुटुंबाच्या यूट्यूब व्लॉगमध्ये आर्यमानने समय रैनाच्या विनोदावर प्रतिक्रिया देत समयची बाजू घेतली. आर्यमान म्हणाला, “मी सहसा अशा काही विषयांवर बोलत नाही. पण यावेळी बोलावे असे वाटले, कारण- मला या प्रतिक्रिया फारच मजेशीर वाटल्या आहेत. समयने केलेला तो विनोदही मजेशीर होता. कारण आम्ही जेव्हा व्लॉग करतो तेव्हा घरीच असतो, त्यामुळे त्यात काही चुकीचं नाही.”
पुढे तो म्हणाला, सर्वात आधी हे लक्षात घेऊया की तो एक विनोद होता आणि ते ठीक आहे. मला किंवा माझ्या कुटुंबातील कोणालाही दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता. माझी आईही तिच्या विनोदांमधूनच कमाई करते. कॉमेडी पाहणारे लोक आता काहीसे जास्तच संवेदनशील झाले आहेत, हा फक्त एक विनोद आहे.”
दरम्यान, समय रैनाने अर्चना पूरन सिंह यांच्याबद्दल केलेल्या विनोदामुळे काही प्रेक्षकांना समयने मर्यादा ओलांडल्याचं वाटत असेल हे आर्यमानने मान्य केले. मात्र, या सगळ्यात कुटुंबातील संबंधित व्यक्तींना जितके वाईट वाटले नाही, त्यापेक्षा बाहेरच्या लोकांनाच अधिक का वाईट वाटत आहे, असा सवालही आर्यमानने केला.
अर्चना पूरन सिंह यांची समय रैनाच्या विनोदावर प्रतिक्रिया
अर्चना पूरन सिंह यांनीही यावर प्रतिक्रिया देत ‘इंडियाज गॉट लेटंट’मध्ये सहभागी होण्याबद्दल कोणताही पश्चत्ताप होत नसल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “या शोमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार आहे, याची मला पूर्ण कल्पना होती. शोचं स्वरूप समजून घेतल्यामुळे समय रैनाची वक्तव्ये ही वैयक्तिक नाहीत हे मला माहीत आहे. मला वैयक्तिकरित्या कोणत्याही गोष्टीचा राग आला नाही.”
