बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व आता शेवटच्या टप्प्यात आले असून, आता या स्पर्धेचा विजेता कोण असणार? याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळत आहे. अंतिम सोहळा तोंडावर असताना अरमान मलिक आणि लवकेश कटारिया हे स्पर्धेतून बाद झाले आहेत. आता बिग बॉस(Bigg Boss OTT) च्या घराबाहेर पडल्यानंतर या पर्वाचा विजेता कोण असेल, यावर अरमान मलिकने वक्तव्य केले आहे. त्याने ज्या स्पर्धकाचे नाव घेतले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. काय म्हणाला अरमान मलिक? अरमान मलिकने एका मुलाखतीत बिग बॉसचा विजेता कोणता स्पर्धक असायला हवा यावर वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे, "या पर्वाचा विजेता रणवीर शौरी व्हायला पाहिजे. २५ लाख ही त्याच्यासाठी फार छोटी रक्कम आहे. घरातील तो असा स्पर्धक आहे की, जो जिंकण्यास पात्र आहे. माझी इच्छा आहे की, ट्रॉफी त्यालाच मिळावी." रणवीर शौरीला जिंकलेली रक्कम देण्याबाबत अरमान मलिकने वक्तव्य केले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना रणवीर जिंकण्यास पात्र असल्याचे त्याने म्हटले आहे. बिग बॉसच्या घरातील स्वत:च्या प्रवासाबद्दल बोलताना अरमान मलिकने म्हटले आहे की, माझा बिग बॉसमधील प्रवास इथपर्यंतच होता. मी कधीही विचार केला नव्हता की, शोच्या शेवटपर्यंत असेन. एकच दिवस राहिला होता आणि मी घराबाहेर पडलो. बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात अरमान मलिक आणि विशाल पांड्ये यांच्यात जोरदार भांडण झाले होते. विशालने अरमानची पत्नी कृतिकावर कमेंट केल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. अरमानने विशाल पांड्येच्या कानाखाली मारली होती. या घटनेनंतर प्रेक्षकांकडून अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी केली जात होती. त्यावर बोलताना अरमानने म्हटले आहे की, तरीही मी विशालनंतरच घराबाहेर पडलो आहे; असे कसे झाले? हेही वाचा: Bigg Boss : “…तर यांचं शिक्षण चुलीत घाला”, सूरज चव्हाणला मराठी अभिनेत्याचा फुल्ल सपोर्ट; म्हणाला, “तू सच्चा आहेस” २ ऑगस्टला पार पडणाऱ्या बिग बॉसच्या अंतिम महासोहळ्यात सना मकबूल, साई केतन राव, कृतिका मलिक, रणवीर शौरी व नैझी या पाच स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक ट्रॉफी आपल्या नावावर करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अनिल कपूर या शोचे पहिल्यांदाच सूत्रसंचालन करीत असून याआधी सलमान खानने ही धुरा सांभाळली होती. दरम्यान, अरमान मलिकची पत्नी कृतिका ट्रॉफीसाठी लढताना स्वत:च्या पत्नीचे नाव न घेता, रणवीर शौरीचे नाव घेतल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.