Pritam And Pedro Jio Hotstar OTT Record: जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या ६ एपिसोड्सच्या एका क्राईम, ड्रामा, थ्रिलर आणि कॉमेडी सीरिजचा जलवा पाहायला मिळतोय. रिलीज होताच या सीरिजने जिओ हॉटस्टारवर एक नवा विक्रम रचला आहे. विशेष बाब म्हणजे, बॉक्स ऑफिसवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या एका टॉप दिग्दर्शकाने या सीरिजची निर्मिती केली आहे, तर या सीरिजच्या मुख्य अभिनेत्याची ही पहिली सीरिज आहे. या सीरिजचं नाव आहे ‘प्रीतम अँड पेड्रो’. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सीरिजमधून त्यांचा मुलगा वीर हिरानीने पदार्पण केलंय.

‘प्रीतम अँड पेड्रो’ बनली सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज

राजकुमार हिरानी यांची बहुप्रतिक्षित ओटीटी डेब्यू सीरिज ‘प्रीतम अँड पेड्रो’ने जिओ हॉटस्टारवर धुमाकूळ घातला आहे. रिलीज होताच ही जिओ हॉटस्टारवरील आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज ठरली आहे. इतकंच नाही तर या सीरिजने कोणत्याही स्क्रिप्टेड शोसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग देखील नोंदवली आहे. हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, मराठी आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये ही सीरिज ट्रेंड करत आहे.

‘प्रीतम अँड पेड्रो’च्या यशावर हिरानींची प्रतिक्रिया

राजकुमार हिरानी म्हणाले, “प्रेक्षकांनी आपला वेळ देऊन या सीरिजला प्रचंड प्रतिसाद दिला. बिंज वॉचिंग करून ‘प्रीतम अँड पेड्रो’ला मिळालेले प्रचंड प्रेम पाहून आम्ही सुखावलो आहोत. या सीरिजमधील पात्रे देशभरात चर्चेचा विषय बनली आहेत हे पाहून आनंद होतोय. अनेकदा म्हटलं जायचं की ओटीटीवर फक्त गंभीर आणि डार्क कथाच यशस्वी होतात, पण मला वाटतं की या सीरिजला मिळालेलं यश हेच सिद्ध करतं की प्रेक्षक कोणत्याही ठराविक जॉनरला नाही, तर अशा कथांना पसंत करतात ज्या त्यांना हसवतात, भावुक करतात आणि सीरिज संपल्यानंतरही बऱ्याच काळासाठी त्यांच्या मनात घर करून राहतात. ही सीरिज वेगवेगळ्या भाषांमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे देखील याचंच प्रतीक आहे की भावनांना कोणतीही भाषा किंवा सीमा नसते. या कथेवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि ती भारतातील करोडो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी जिओ हॉटस्टारचे मनापासून आभार मानतो.”

‘प्रीतम अँड पेड्रो’ सीरिज

जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत असलेली ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही एक इंडियन सायबर क्राईम कॉमेडी थ्रिलर सीरिज आहे. ही ३ जुलैला ओटीटीवर रिलीज झाली. ६ एपिसोड्सच्या या सीरिजला आयएमडीबीवर ८.० चे रेटिंग मिळाले आहे. अविनाश अरुण ढवळे दिग्दर्शित ‘प्रीतम अँड पेड्रो’मध्ये अर्शद वारसी, विक्रांत मॅसी, बोमन इराणी, मोना सिंग आणि वीर हिरानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.