Aspirants Season 3 : हल्ली ओटीटीमुळे वेब सीरिज मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम झालं आहे. आतापर्यंत हिंदीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित अनेक वेब सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. काही वेब सीरिजचे तर पाच-सहा सीझनही प्रदर्शित झाले आहेत. आपल्या कथानकामुळे काही वेब सीरिजनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘एस्पिरंट्स’.

शिक्षण, करिअर, प्रेम, मैत्री यांवर आधारित या सीरिजचा पहिला सीझन २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला. तेव्हा या सीरिजला खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यातील सर्व पात्रं हिट झाली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांची स्वप्नं, करिअर आणि त्यादरम्यान येणारं अपयश यांभोवती या सीरिजची कथा फिरते. या सीरिजचे दोन सीझन आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. अशातच आता या लोकप्रिय सीरिजचा तिसरा सीझन लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

कधी प्रदर्शित होणार ‘एस्पिरंट्स’चा तिसरा सीझन?

‘एस्पिरंट्स’ या लोकप्रिय सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ‘एस्पिरंट्स’ या सीरिजचा तिसरा सीझन १३ मार्च रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एबीपीच्या वृत्तानुसार ही मालिका भारतासह जगभरात २४० पेक्षाही अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्राइम व्हिडीओवर ही मालिका पाहण्यासाठी उपलब्ध असेल.

एस्पिरंट्स ३ सीरिजची कास्ट

‘एस्पिरंट्स’ सीझन ३मध्ये नवीन कस्तुरिया मुख्य भूमिकेत आहे. त्यामधून तो पुन्हा एकदा अभिलाष या भूमिकेतून झळकणार आहे; तर शिवांकित सिंह परिहार, सनी हिंदुजा, नमिता दुबे व टेंगम सेलीन त्यांच्या त्यांच्या भूमिकांमधून पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. या पर्वामध्ये नवीन कलाकारांच्या यादीत जतीन गोस्वामीच्या नावाचा समावेश आहे.

‘एस्पिरंट्स ३’ची कथा काय आहे?

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार डीएम अभिलाषचं आयुष्य दोन भागांत विभागलेलं पाहायला मिळेल. आता अभिलाष जिल्हा न्यायाधीश म्हणून काम करत आहे आणि त्याची सहायक कामगार आयुक्त (Assistant Labour Commissioner -एएलसी) संदीप ओहलाल याने त्याच्यावर केलेल्या आरोपांमुळे चौकशी सुरू असते. परंतु, त्याचा परिणाम त्याच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यावर होत असतो. पूर्वी अभिलाष आयआरएस [Indian Revenue Service – भारतीय महसूल सेवा)च्या परीक्षेसाठी तयारी करत होता; परंतु आता ते पद मिळाल्यानंतरही तो मुखर्जीनगरमध्ये पुन्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो. त्यामध्ये नवीन मैत्री, शत्रुत्व व जुने स्वप्न हे सगळं पाहायला मिळणार आहे. तर सीझन ३ मध्ये पात्रांचा प्रवास स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यापलीकडे जाणार आहे.