ओटीटीवर अलीकडे क्राइम थ्रिलर प्रकारातील वेब सीरिजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळतेय. पण ओटीटीवर सीरिज पाहण्याची आवड असलेले लोक दर आठवड्याला काहीतरी नवीन शोधत असतात. जर तुम्हालाही या वीकेंडला काहीतरी उत्तम पाहायचं असेल, तर प्राइम व्हिडीओची ही सीरिज तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

या सीरिजमध्ये कपूर कुटुंबातील नवोदित स्टार जहान कपूर, ज्याने ‘ब्लॅक वॉरंट’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती तो आहे. त्याने या सीरिजमध्ये उत्तम काम केलं आहे. त्याचबरोबर इतर कलाकारांच्या अभिनयाचंही खूप कौतुक होत आहे. तुम्ही ही सीरिज अद्याप पाहिली नसेल तर ती या वीकेंडला नक्की पाहा.

या सीरिजचं नाव ‘बँडवाले’ (Bandwaale) आहे. ही नुकतीच फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रदर्शित झालेली म्युझिकल कॉमेडी-ड्रामा सीरिज आहे. या सीरिजमध्ये मध्य प्रदेशातील रतलाम शहराची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे.

Award Banner

बँडवाले सीरिजची कथा काय?

ही गोष्ट मरियम नावाच्या एका तरुण मुलीची आहे. तिची कवयित्री बनायची इच्छा आहे. मात्र, तिचे वडील अत्यंत कडक स्वभावाचे आणि जुन्या विचारांचे आहेत. आपल्या वडिलांपासून लपून मरियम सोशल मीडियावर आपली कविता पोहोचवण्यासाठी धडपड करते. या प्रवासात तिला रोबो (एक बँड सिंगर) आणि डीजे सायको यांची साथ मिळते. हे तिघे मिळून एक बँड तयार करतात आणि तिथूनच सगळा ड्रामा सुरू होतो.

बँडवाले सीरिजमधील कलाकार

या सीरिजमध्ये मरियमची भूमिका अभिनेत्री शालिनी पांडेने केली आहे. तर, डीजे सायकोच्या भूमिकेत अभिनेता जहान कपूर आहे. स्वानंद किरकिरे रोबो कुमारच्या भूमिकेत आहेत. आशिष विद्यार्थींनी मरियमच्या वडिलांची भूमिका केली आहे. तसेच संजना दीपू, अनुपमा कुमार यांनी काम केलं आहे.

या सीरिजची खासियत अशी की तुम्ही ती कुटुंबाबरोबर बसून पाहू शकता. आजच्या काळात शिवीगाळ किंवा अपशब्द नसलेली वेब सीरिज शोधणं सोपं काम नाही. पण जहान कपूरची ही सीरिज कुटुंबाबरोबर पाहण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. चाहते आणि समीक्षकांकडूनही या सीरिजला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

बँडवाले आयएमडीबी रेटिंग

जहान कपूरची बँडवाले सीरिज प्राइम व्हिडीओवर येताच हिट ठरली आहे. ही फॅमिली ड्रामा सीरिज तुमचे मनोरंजन करण्याबरोबरच तुम्हाला प्रेरणा देते. या वेब सीरिजला आयएमडीबीवर (IMDb) ७.१ रेटिंग मिळाले आहे. जर तुम्ही अजूनही ही सीरिज पाहिली नसेल, तर प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही घरबसल्या याचा आनंद घेऊ शकता.