Banned Bold Indian Films availabe on OTT : भारतीय चित्रपटसृष्टीत अनेकदा बोल्ड कथानक, समलैंगिकता, राजकीय भाष्य किंवा अतिरेकी हिंसाचार यांसारख्या संवेदनशील विषयांवरून वाद निर्माण झाले आहेत. यामुळे सेन्सॉर बोर्डाने काही चित्रपटांवर थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास बंदी घातली होती. चित्रपटगृहांचे कडक नियम आणि सामाजिक विरोधाचा सामना करावा लागल्यामुळे हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकले नव्हते. परंतु, बदलत्या तंत्रज्ञानासोबतच आता ही परिस्थिती बदलली आहे.
ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सच्या आगमनामुळे या बंदी घालण्यात आलेल्या चित्रपटांना एक नवे व्यासपीठ मिळाले. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि डिस्ने+ हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्म्सवर ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘फायर’ आणि ‘बँडिट क्वीन’ यांसारखे चित्रपट आता सहज उपलब्ध आहेत. चित्रपटगृहांच्या तुलनेत ओटीटीवर सेन्सॉरशिपचे नियम वेगळे आणि काहीसे लवचिक असल्यामुळे हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत कोणत्याही कात्रीशिवाय पोहोचत आहेत.
फायर
दिग्दर्शिका दीपा मेहता यांच्या ‘फायर’ या चित्रपटात एका सनातनी भारतीय कुटुंबातील समलिंगी संबंधांची गोष्ट दाखवण्यात आली होती. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट १९९६ साली रिलीज झाला होता. यात शबाना आझमी व नंदिता दास यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
बँडिट क्वीन
‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट फूलन देवी यांच्या जीवनावर आधारित आहे. फूलन देवी यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाचा आणि अत्याचाराचा सूड घेतला होता. या चित्रपटातील दृश्यांमुळे सुरुवातीला या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. १९९४ साली आलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केलं होतं. सीमा बिस्वास यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
ब्लॅक फ्रायडे
हुसैन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित असलेला हा चित्रपट १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रकाश टाकतो. या स्फोटांमागील कट, कारस्थान, गुंतागुंत आणि तपास या गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. अनुराग दिग्दर्शित या चित्रपटात केके मेनन, पवन मल्होत्रा, आदित्य श्रीवास्तव हे कलाकार होते. ब्लॅक फ्रायडे हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
लिपस्टिक अंडर माय बुरखा
महिलांची लैंगिकता आणि त्यांच्यावर असणारे सामाजिक निर्बंध या विषयांवर भाष्य करणाऱ्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला त्याच्या बोल्ड कथेमुळे सुरुवातीला बंदीचा सामना करावा लागला होता. परंतु, नंतरच्या काळात या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर यश मिळालं. २०१६ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अलंक्रिता श्रीवास्तवने केलं होतं. कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शाह हे कलाकार या सिनेमात आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
अँग्री इंडियन गॉडेस
Angry Indian Goddesses : बोल्ड कंटेंटमुळे या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर चांगलाच वाद निर्माण झाला होता. लोकांनी या चित्रपटाला विरोधही केला. त्याचवेळी सेन्सॉर बोर्डानेही यावर कात्री चालवली. यानंतर निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.
लोएव
Loev: दोन गे मुलांच्या लव्ह लाइफवर आधारलेला हा सिनेमा आहे. समलैंगिक संबंधांवर आधारित या चित्रपटात खूप बोल्ड सीन आहे. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.
जाऊ कहां बता ऐ दिल
Jaoon Kahan Bata Ae Dil : या चित्रपटात खुशबू उपाध्याय, मराठी अभिनेता रोहित कोकाटे, हिमांशू कोहली यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात बोल्ड कंटेंटचा भडिमार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
अनफ्रीडम
Unfreedom on Netflix : ‘अनफ्रीडम’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बोल्ड कंटेंटमुळे बंदी घालण्यात आली होती. नंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. हा सिनेमा युट्यूबवर पाहता येईल.
