Best Crime Thriller Movie on Prime Video : काही चित्रपट इतके दमदार असतात की बऱ्याच वर्षांनंतरही त्याची चर्चा होत राहते. २०१४ साली असाच एक सुपरहिट चित्रपट तमिळमध्ये आला होता. या चित्रपटाची कथा इतकी जबरदस्त होती की पुढे या चित्रपटाचे तेलुगू व हिंदीत रिमेक बनवण्यात आले.

या चित्रपटाचे नाव ‘रत्सासन’ (Ratsasan) आहे. हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला एक तमिळ सायकोलॉजिकल क्राईम-थ्रिलर चित्रपट आहे, ज्याने भारतीय चित्रपटसृष्टीत क्राईम-थ्रिलर चित्रपटांसाठी एक नवा मापदंड प्रस्थापित केला. राम कुमारने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट केवळ तमिळनाडूतच नव्हे, तर संपूर्ण भारतात कमालीचा लोकप्रिय ठरला. पुढे हिंदीमध्ये ‘कठपुतली’ या नावाने रिमेक करण्यात आला. त्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता.

८.३ रेटिंग असलेल्या या चित्रपटाची कथा अरुण (विष्णू विशाल) नावाच्या एका तरुणाभोवती फिरते, ज्याला सायको किलर्सवर आधारित चित्रपट बनवण्याची तीव्र इच्छा असते. त्याने जगभरातील विविध सिरियल किलर्सचा सखोल अभ्यास केलेला असतो. मात्र, वडिलांच्या निधनानंतर घरच्यांच्या इच्छेखातर तो चित्रपट बनवण्याचे स्वप्न बाजूला ठेवतो आणि पोलीस दलात उपनिरीक्षक (PSI) म्हणून रुजू होतो.

त्याच वेळी शहरात एक भयानक प्रकार सुरू होतो. शालेय मुलींचे अपहरण होते आणि त्यांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडतात. या खुन्याची पद्धत अतिशय क्रूर असते. पोलीस प्रशासन जेव्हा जुन्या पद्धतीने तपास करण्यात अपयशी ठरते, तेव्हा अरुण आपल्या फिल्म रिसर्चचा आणि गुन्हेगारांच्या मानसिकतेच्या अभ्यासाचा वापर करून या प्रकरणाचा तपास सुरू करतो. तो खूनी कोण आहे आणि तो मुलींनाच लक्ष्य का करत आहे, याचा शोध अरुण घेतो. हा एकूण थरार म्हणजे ‘रत्सासन’ चित्रपट होय.

‘रत्सासन’ची खासियत

१. दमदार बॅकग्राउंड म्युझिक: जीब्रान यांनी दिलेले संगीत ‘रत्सासन’ या चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपटातील भीती आणि सस्पेन्स वाढवण्यात संगीताचा मोठा वाटा आहे.

२. खलनायकाची भूमिका: या चित्रपटातील विलन ‘ख्रिस्तोफर’ हा भारतीय सिनेमातील सर्वात भयानक खलनायकांपैकी एक ठरला. त्याची पार्श्वभूमी आणि खुनाचा हेतू प्रेक्षकांना सुन्न करून सोडतो.

३. दिग्दर्शन आणि पटकथा: चित्रपटाचा वेग इतका अचूक आहे की अडीच तासांहून अधिक वेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रत्येक वळणावर या सिनेमात नवीन रहस्य उलगडतं, त्यामुळे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागतो. .

या चित्रपटात विष्णू विशाल, अमला पॉल, सरवणन (खलनायक) यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राम कुमारने केलं आहे.

‘रत्सासन’ हा केवळ एक चोर-पोलीस असा चित्रपट नसून, तो मानवी मानसिकतेच्या काळ्या बाजूवर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या मनात पुढे काय घडणार हे विचार येत राहतात. हे एका उत्कृष्ट क्राईम थ्रिलरचे लक्षण आहे. जर तुम्हाला सस्पेन्स आणि डार्क थ्रिलर आवडत असतील, तर हा चित्रपट चुकवू नये असा आहे.