Best Movies On Netflix : ओटीटी मनोरंजन विश्वामध्ये ‘नेटफ्लिक्स’ हे प्रेक्षकांचे सर्वाधिक आवडत्या प्लॅटफॉर्मपैकी एक मानले जाते. दर आठवड्याला नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असल्याने काय पाहायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकदा चित्रपट निवडण्यातच बराच वेळ निघून जातो. अशा वेळी तुमचा हा शोध सोपा करण्यासाठी नेटफ्लिक्सवरील काही दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटांची खास यादी समोर आली आहे. दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि वेगळ्या विषयांमुळे हे चित्रपट तुमच्या ‘वॉच लिस्ट’मध्ये नक्की असायला हवेत. कोणकोणते आहेत ते चित्रपट, जाणून घेऊया…
- ‘इन्ग्लोरियस बॅस्टर्ड्स’
दिग्दर्शक क्वेंटिन टरँटिनो यांचा ‘इन्ग्लोरियस बॅस्टर्ड्स’ हा अत्यंत लोकप्रिय चित्रपट आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात दोन समांतर कथा पाहायला मिळतात. लेफ्टनंट आल्डो रेन (ब्रॅड पिट) यांच्या नेतृत्वाखालील ज्यू-अमेरिकन सैनिकांचा गट आणि आपल्या कुटुंबाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेली शोसाना ड्रेफस (मेलानी लॉराँ) यांची कथा प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. नाझी अधिकाऱ्याविरोधात आखलेल्या योजनांमुळे कथेला थरारक वळण मिळते. ऑस्करविजेते क्रिस्टोफ वॉल्ट्झ यांचा दमदार अभिनयआणि जबरदस्त अॅक्शन यांमुळे हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
- अमेरिकन सायको
आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट सायकोलॉजिकल चित्रपटांपैकी ‘अमेरिकन सायको’ हा एक मानला जातो. त्यामध्ये ख्रिश्चन बेल यांनी पॅट्रिक बेटमन या श्रीमंत बँकरची भूमिका साकारली आहे. श्रीमंत जीवनशैली आणि प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची आवड असलेला पॅट्रिक प्रत्यक्ष आयुष्यात मात्र एका धक्कादायक मानसिक आजारातून जात असतो. वास्तव आणि स्वप्नांची दुनिया यांच्यातील फरक हळूहळू नाहीसा होत असल्याचे चित्रण यामध्ये प्रभावीमध्ये मांडण्यात आले. ख्रिश्चन बेल यांचा दमदार अभिनय आणि थरारक कथानक यांमुळे हा सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम ठेवतो.
- आरआरआर
एस. एस. राजामौली यांच्या आरआरआर या भव्य-दिव्य चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्याचबरोबर तो ओटीटीवर धुमाकूळ घालतो आहे. ब्रिटिश राजवटीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटात दोन क्रांतिकारक – कोमाराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या प्रवासाची कथा दाखवण्यात आली आहे. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षक थक्क झाले आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीत घडणाऱ्या घटनांनी कथेला वेगळे वळण मिळते. दमदार अॅक्शन, भव्य दृश्ये आणि भावनिक प्रसंगांसह या दोन्ही पात्रांमधील मैत्री ही चित्रपटाची सर्वांत मोठी ताकद ठरते.
- ‘टॅक्सी ड्रायव्हर’
या चित्रपटामध्ये न्यूयॉर्क शहरात टॅक्सी ड्रायव्हर म्हणून आयुष्य जगणाऱ्या ट्रॅव्हिस बिक्लची गोष्ट दाखवण्यात आली आहे. व्हिएतनाम युद्धातून परतलेल्या माजी सैनिकाची मानसिकता कशी असू शकते याचा विचार करायला भाग पाडणारा हा सिनेमा आहे. मार्टिन स्कोर्सेसी यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात ट्रॅव्हिसचा एकाकीपणा आणि निराशा प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. सिनेमातील डी नीरोचा अभिनय प्रभावी अभिनय हा तितकाच खोलवर अस्वस्थ करणारा आहे.
- ‘शटर आयलंड’
मार्टिन स्कोर्सेसी दिग्दर्शित ‘शटर आयलंड’ हा एक मानसशास्त्रीय थरारक असा चित्रपट आहे. हा सिनेमा हळूहळू गूढ जगामध्ये घेऊन जातो आणि वास्तवाची जाणीव पूर्णपणे बदलतो. ही कथा यूएस मार्शल टेडी डॅनियल्स (लिओनार्डो डिकॅप्रियो) या पात्राभोवती फिरते. तो एका निर्जन बेटावरील मानसोपचार केंद्रातून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा तपास करीत असतो. जसजसा टेडी या प्रकरणाचा अधिक खोलवर तपास करतो, तसतसे गूढ अधिकाधिक उलगडत जाते. हा चित्रपट केवळ एक रहस्यकथा नाही, तर ती गूढकथा बनते आणि त्याचे चित्रीकरण अंगावर शहारा आणणारे आहे.
- अनोरा
ऑस्कर विजेते दिग्दर्शक शॉन बेकर यांचा ‘अनोरा’ चित्रपट एका अनपेक्षित प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटात ब्रुकलिनमध्ये राहणारी अनोरा (मायकी मॅडिसन) ही तरुणी आणि एका श्रीमंत रशियन उद्योगपतीचा मुलगा वान्या (मार्क आयडेलश्टेन) यांच्या नात्याची कथा दाखवण्यात आली आहे. दोघे अचानक लग्न करतात; मात्र वान्याच्या कुटुंबाच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळते. प्रेम, संघर्ष आणि भावनिक चढ-उतार यांचा सुरेख मिलाफ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो.
- फाईट क्लब
दिग्दर्शक डेव्हिड फिंचर यांचा ‘फाईट क्लब’ हा सायकॉलॉजिकल ड्रामा आणि थ्रिलर चित्रपटांमधील एक उत्कृष्ट चित्रपट मानला जातो. या चित्रपटात झोप न येण्याच्या त्रासाने त्रस्त असलेला एक कर्मचारी आणि टायलर डर्डन (ब्रॅड पिट) यांच्यातील अनोख्या मैत्रीची कथा दाखवण्यात आली आहे. एका साध्या फाईट क्लबपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे धक्कादायक आणि अनपेक्षित वळण घेतो. दमदार अभिनय, वेगवान कथानक व शेवटचा ट्विस्ट यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील.
- ‘द ट्रूमैन शो’
‘द ट्रूमैन शो’ हा जिम कॅरी यांच्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक मानला जाणारा सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. यामध्ये नायक हा एक सामान्य विमा काढणारा व्यक्ती दाखवण्यात आला आहे. मात्र त्याचे संपूर्ण आयुष्य जगभर लाईव्ह पाहिला जाणारा रिअॅलिटी शो असल्याचे त्याला हळूहळू समजते. त्यानंतर सत्य शोधण्याचा आणि स्वतःचे स्वातंत्र्य मिळवण्याचा त्याचा प्रवास सुरू होतो. ओळख, स्वातंत्र्य आणि वास्तव यांसारख्या विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो.
- द आयरिशमन
दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी यांचा द आयरिशमन हा गुन्हेगारी विश्वावर आधारित दमदार चित्रपट आहे. दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक फ्रँक शीरन (रॉबर्ट डी नीरो) याचा माफियाच्या जगतातील प्रवास आणि त्यातून निर्माण होणारे नातेसंबंध या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. जिमी हॉफा (अल पचिनो) याच्याशी असलेली त्याची घट्ट मैत्री पुढे एका धक्कादायक वळणावर येऊन पोहोचते. निष्ठा, सत्ता आणि कठीण निर्णय यांचा वेध घेणारा हा चित्रपट असून, त्यामध्ये रॉबर्ट डी नीरो, जो पेस्की व अल पचिनो या कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत.
- तलवार
दिग्दर्शिका मेघना गुलजार यांचा ‘तलवार’ चित्रपट २००८ मधील नोएडा दुहेरी हत्याकांडाच्या सत्य घटनेवर आधारित आहे. आरुषी तलवार नावाची तरुणी आणि घरातील मदतनीस यांच्या हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास केला जातो. वेगवेगळ्या यंत्रणांकडून कशा प्रकारे तपास केला जातो हे प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. प्रत्येक तपासातून समोर येणारी वेगवेगळी बाजू प्रेक्षकांना शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडते. रहस्य, तपास आणि न्यायव्यवस्थेतील गुंतागुंत यांचे वास्तववादी चित्रण करणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकतो.
- अमेरिकन मेड
टॉम क्रूझच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असा ‘अमेरिकन मेड’ चित्रपट असून, तो सत्य घटनेपासून प्रेरित आहे. १९८० च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटात एका व्यावसायिक वैमानिकाची कथा दाखवण्यात आली आहे, जो एका ड्रग्ज कार्टेलसाठी तस्करी करण्यास सुरुवात करतो. त्याला पकडल्यानंतर तो अमेरिकन सरकारशी करार करून गुप्त माहिती देणारा बनतो आणि दुहेरी आयुष्य जगू लागतो. थरार, विनोद आणि वेगवान कथानक यांचा उत्तम मिलाफ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देतो.
