ओटीटीवर तेच तेच रोमँटिक चित्रपट पाहून कंटाळा आला असेल आणि एखादी बुद्धीला चालना देणारी मर्डर मिस्ट्री पाहायची असेल, तर ‘युथम सेई’ (Yutham Sei) हा तमिळ चित्रपट तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेला दिग्दर्शक मिस्किन यांचा हा डार्क क्राईम थ्रिलर आजच्या घडीलाही ओटीटीवरील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

काय आहे चित्रपटाची कथा?

चेन्नईच्या पावसात भिजलेल्या रस्त्यांवर अचानक अत्यंत सुंदर गिफ्ट पॅकमध्ये गुंडाळलेले मानवी छाटलेले हात सापडतात. दुसऱ्याच दिवशी सकाळी ही घटना वाऱ्यासारखी शहरभर फिरते. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडते आणि इथूनच प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या प्रवासाला सुरुवात होते.

बहिणीच्या बेपत्ता होण्याने असतो त्रस्त

कथेच्या केंद्रस्थानी जे.के. कृष्णमूर्ती नावाचा एक अधिकारी आहे. ही भूमिका अभिनेता चेरनने साकारली आहे. जे.के. मानसिकदृष्ट्या खूप तणावात असतो, कारण त्याची स्वतःची बहीण मागील तीन महिन्यांपासून बेपत्ता असते आणि तो तिला शोधत असतो. या मानसिक तणावामुळे तो नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असतो, पण त्याचा वरिष्ठ अधिकारी त्याचा राजीनामा नाकारतो.

जे.के. तमिळसेल्वी (दीपा शाह) आणि मुख्य पॅथॉलॉजिस्ट डॉ. जुडास (जयप्रकाश) यांच्यासोबत मिळून हे छाटलेल्या बोटांचं कोडं सोडवायला सुरुवात करतो. जसा तपास पुढे सरकतो, तसं जे.के.ला समजतं की जे छाटलेले हात शहरातील विविध ठिकाणांहून सापडत आहेत, ते समाजातील काही गुन्हेगार आणि पोलिसांचे आहेत. हे गुन्हेगार व एक खूप मोठे देहविक्री रॅकेट आणि गुन्हेगारी सिंडिकेट चालवत असतात. कथेत सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे हे खून कोणी सामान्य सिरीयल किलर करत नसतो, तर एक प्रतिष्ठित डॉक्टर (वाय. जी. महेंद्रन) आणि त्यांची पत्नी (लक्ष्मी रामकृष्णन) यांचे कुटुंब करत असते.

कधी प्रदर्शित झाला होता ‘युथम सेई’?

२०११ च्या ‘युथम सेई’ या तमिळ चित्रपटात चेरन, दीपा शाह, वाय. जी. महेंद्रन आणि लक्ष्मी रामकृष्णन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मिस्किन यांनी केले आहे, तर याची निर्मिती ‘एजीएस एंटरटेनमेंट’ने केली आहे.

आयएमडीबीवर मिळाले ७.९ रेटिंग

आयएमडीबीवर ७ किंवा त्याहून अधिक रेटिंग खूप चांगले मानले जाते. या चित्रपटाला ७.९ असे उत्तम रेटिंग मिळाले आहे. तुम्ही युथम सेई हा चित्रपट पाहिला नसेल तर तो जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.