‘दम लगाके हई शा’ या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी सतत चर्चेत असते. भूमीची पात्रं नेहमी वेगळ्या धाटणीची असतात. भूमीचा आगामी चित्रपट ‘भक्षक’ ९ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. या क्राईम थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर या चित्रपटात पत्रकार वैशाली सिंहच्या प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सीआयडी फेम अभिजीत म्हणजेच आदित्य श्रीवास्तव खलनायक बन्सी साहूची भूमिका साकारणार आहे. मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर यात पोलिसच्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय मिश्रा, विभा छिब्बर, सूर्या शर्मा आणि तनिशा मेहता या कलाकारंच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत.
हेही वाचा… “लग्नासाठी मला प्रीती झिंटा…”, सलमान खानने जेव्हा अभिनेत्रीबद्दल केलेलं विधान
चित्रपटाच्या ट्रेलरनुसार, ही कथा अनाथ मुलींच्या सभोवताली फिरताना दिसते. ‘अनाथचा अर्थ असा की ज्याचा कोणीचं नाथ नाही.. तुमचं अस्तित्व कोणालाच माहित नाही..’ अशा संवादाने या ट्रेलरची सुरूवात होते. अनाथ मुलींना चुकीची औषधे देऊन त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करणारा खलनायक बन्सी साहू निर्धास्तपणे गुन्हे करत फिरतोय आणि या अन्यायाविरुद्ध लढणारी पत्रकार वैशाली सिंह निडरपणे सत्य जगासमोर आणण्याच्या प्रयत्न करतेय. अनाथ मुलींवर होणाऱ्या अन्यायाविषयी सरकारला माहित असूनही बन्सी साहूच्या दबावाखाली सरकार गप्प आहे. या गोष्टी बाहेर आणण्यासाठी भूमीचं पात्र सहकलाकारांच्या मदतीने प्रयत्न करतंय. या लढ्यात प्रत्येकजण आपली भूमिका चोखपणे बजावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा… अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘या’ पुरस्काराने गौरव; अभिनेत्री म्हणाली, “भारतीय म्हणून मला….”
पत्रकारच्या भूमिकेत असलेल्या भूमीला महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे वास्तव जगासमोर आणून एक भयंकर गुन्हा उघडकीस आणायचा आहे. प्रत्येक पावलावर भूमी आव्हानात्मक कामगिरी बजावताना दिसतेय. पोलिसांना, जनतेला, सरकारला शेवटी ती एक प्रश्न विचारते, ‘दुसऱ्यांच्या दु:खात सहभागी होणं विसरलायत का तुम्ही? आजही तुम्ही तुमची गणना माणसांमध्ये करताय की स्वत:ला ‘भक्षक’ मानून मोकळे झाला आहात का?’
दरम्यान, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असही म्हटलं जातंय. या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. भूमीचा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.