अमेझॉन एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या ‘भय: द गौरव तिवारी मिस्ट्री’ (Bhay: The Gaurav Tiwari Mystery) ही वेबसीरिज प्रचंड चर्चेत आहे. ही सीरिज केवळ काल्पनिक भयपट नसून ती एका सत्य घटनेवर आधारित आहे. ही सीरिज भारताचे पहिले ‘पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर’ गौरव तिवारी यांच्या जीवनावर आधारित आहे. सोशल मीडियावर या सीरिजची खूप चर्चा होत आहे.
ही सीरिज अंगावर शहारे आणणाऱ्या एका शवगृहाच्या दृश्याने सुरू होते. तिथे गौरव तिवारीचे शवविच्छेदन सुरू असते. सुरुवातीला पोलिसांना वाटते की ही आत्महत्या आहे, परंतु त्याच्या मानेवर आढळलेल्या विचित्र खुणा कथेला वेगळ्या दिशेने घेऊन जातात. मग, एक लेखक गौरवच्या जीवनावर एक पुस्तक लिहिताना दाखवते. त्यानंतर कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. त्यात पायलट होण्याचे स्वप्न पाहणारा एक तरुण पॅरानॉर्मल जगात कसा जातो, ते यात पाहायला मिळतं.
रहस्यमय मृत्यू
फ्लॅशबॅकमध्ये गौरवला पायलट बनायचं होतं हे दाखवण्यात आलं आहे. पण एके दिवशी, विमान उड्डाण करताना त्याच्याबरोबर असं काहीतरी घडतं ज्यामुळे तो पॅरानॉर्मल विश्वात जायचं ठरवतो. मग तो तो इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीमध्ये सामील होतो, जिथे तो इतर तीन लोकांबरोबर काम करत असतो. सुरुवातीला, सर्व गोष्टी व्यवस्थित होतात, परंतु पाच वर्षांनी, विचित्र घटना घडू लागतात आणि गौरवचा रहस्यमयीपणे मृत्यू होतो. ‘भय’ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. सीरिजमध्ये अशी अनेक दृश्ये आहेत जी पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील.
कलाकारांचा दमदार अभिनय
अभिनेता करण टॅकरने गौरव तिवारी यांची मुख्य भूमिका साकारली आहे. कल्की कोचलिन ही एका लेखिकेच्या भूमिकेत आहे, जी गौरवच्या मृत्यूचा तपास करत आहे. सलोनी बात्रा, दानिश सूद, निमिशा नायर आणि शुभम चौधरी यांनीही या मालिकेते विविध भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजचं दिग्दर्शन रॉबी ग्रेवालने केलं आहे.
१२ डिसेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झालेली ही सीरिज ओटीटीवरील हॉरर प्रेमींसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही. या मालिकेत केवळ भुते दाखवली नसून, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पॅरानॉर्मल गोष्टी कशा तपासल्या जातात, हे दाखवण्यात आले आहे. या सीरिजला IMDb वर ८.८/१० असे जबरदस्त रेटिंग मिळाले आहे. जर तुम्हाला ‘हॉरर-थ्रिलर’ आवडत असेल आणि एखाद्या व्यक्तीचे रहस्यमय जीवन जाणून घ्यायची इच्छा असेल, तर ही सीरिज तुमच्यासाठी उत्तम आहे. ही मालिका पाहताना काही दृश्ये अत्यंत भीतीदायक असल्याने ती एकट्याने पाहू नका, असंही काही लोक सोसल मीडियावर म्हणत आहे.
