अलीकडच्या काळात विविध विषयांवर भाष्य करणारे अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि बॉक्स ऑफिसवर त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. काही चित्रपट त्याच्या कथेमुळे आणि कलाकारांमुळे विशेष लक्षवेधी ठरले. त्यापैकीच एक म्हणजे छाया कदम यांचा ‘भूतम् भयम्’ हा सिनेमा जो अलीकडेच थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आनंदाची गोष्ट म्हणजे आता हा चित्रपट ओटीटीवर येत आहे.

छाया कदम यांची महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी भूमिका असलेल्या ‘भूतम् भयम्’मध्ये सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे, नील सालेकर, अभिनेता पुष्कराज चिरपुटकर ही मंडळीही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. २४ जुलै रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता आणि आता जवळपास दोन महिन्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहता आला नाही ते आता घरबसल्या या थ्रिलर कॉमेडी चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.

कधी आणि कुठे रिलीज होणार?

एक रहस्यमय प्राचीन नाणं, नोकरी नसलेले सात मित्र आणि शापित वाडा… या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर ‘भूतम् भयम्’ हा नवा मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी फक्त मराठी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक रामचंद्र गांवकर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. झी स्टुडिओ मराठी प्रस्तुत आणि Kyra Kumar Creations निर्मित या चित्रपटात हॉरर, विनोद, रहस्याचा अनोखा मेळ पाहायला मिळणार आहे. एका वेगळ्या अलौकिक घटनेभोवती चित्रपटाची कथा फिरते.

कथेच्या केंद्रस्थानी नोकरी नसलेले सात मित्र आहेत. त्यांच्या हाती एक प्राचीन नाणं लागतं. या नाण्याची खासियत म्हणजे ते कोणत्याही वस्तूचं सोन्यात रूपांतर करू शकतं, अशी त्यांची समजूत असते. रातोरात श्रीमंत होण्याची संधी मिळाल्याचं समजून हे सातही मित्र राणीवाडा नावाच्या एका ओसाड वाड्यात पोहोचतात. मात्र, या वाड्याच्या भिंतींमध्ये अनेक गुपितं दडलेली असतात. त्यानंतर या मित्रांसोबत नेमकं काय घडतं, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार छाया कदम यांनी ‘भूतम् भयम्’ हा चित्रपट वेगळा असल्याचं सांगत, हॉरर आणि विनोदाच्या अनोख्या मिश्रणामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी खास असल्याचं म्हटलं आहे. “भूतम् भयम् हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. या चित्रपटात हॉरर आणि विनोदाचं अनोखं मिश्रण आहे. टीमने उभं केलेलं हे विश्व एकीकडे उत्सुकता वाढवणारं आहे, तर दुसरीकडे मनोरंजनही करणारं आहे” असं छाया कदम यांनी सांगितलं. पुढे त्या म्हणाल्या की, चित्रपटात प्रेक्षकांना हसवणारे अनेक प्रसंग आहेत, पण त्याचवेळी पुढे काय घडणार याचा अंदाज लावता येणार नाही, अशा पद्धतीने कथा पुढे जाते.